चान्नी : स्थानिक जय बजरंग युवक मंडळ संचालित जय बजरंग कला महाविद्यालयात ‘एन.ई.पी. २०२० – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रवास पाच वर्षांचा, सामूहिक चिंतन – आकार भविष्याचा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि जय बजरंग कला महाविद्यालय चान्नी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान प्रा. निवृत्ती वरखेडे (प्रभारी प्राचार्य) यांनी भूषविले, तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. ममता इंगोले (माजी अध्यक्षा, मराठी भाषा व वाणिज्य भाषा अभ्यास मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) उपस्थित होत्या. व्यासपीठावर डॉ. एच. एन. सिन्हा (प्रमुख, मराठी विभाग, सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातुर) आणि संस्थेचे सचिव श्री. गजाननभाऊ इंगळे हे देखील उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे धोरण सत्र २०२४-२५ पासून पदवी स्तरावर लागू झाले असून, त्यासंबंधी शिक्षक व विद्यार्थ्यांमधील साशंकता दूर करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. डॉ. ममता इंगोले यांनी आपल्या सविस्तर व्याख्यानातून धोरणाचे ध्येय, उद्दिष्टे, अंमलबजावणी प्रक्रिया, विषय निवडीचे स्वातंत्र्य, मूल्यांकन पद्धती, क्रेडिट प्रणाली याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की हे धोरण कौशल्यप्रधान, रोजगाराभिमुख आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी विद्यार्थी निर्माण करणारे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनाची सवय जोपासण्याचे आवाहनही त्यांनी केले. धोरण सध्या संक्रमण अवस्थेत असल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्नोत्तर सत्रात आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. संस्थेचे सचिव श्री. गजाननभाऊ इंगळे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी एकरूप होऊन नियमित उपस्थित राहण्याचे आवाहन केले, तर प्राचार्य प्रा. निवृत्ती वरखेडे यांनी धोरणाच्या पाच वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. निलेश सोनोने (राज्यशास्त्र विभागप्रमुख) यांनी केले. या प्रसंगी प्रा. गजानन गाडगे, प्रा. गणेश कालापाड, श्री. संजय जायभाये, श्री. संजय गोपनारायण, श्री. भालेराव, श्री. वसंत ढोकणे, श्री. सातव तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
read also:https://ajinkyabharat.com/three-vikramsah-kohlicha-record-modla/
