देऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

देऊळगाव

सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीस, ठसे तज्ञ व श्वान पथक दाखल
आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळू – ठाणेदार आजिनाथ मोरे

देऊळगाव साखरशा (ता. —) येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते २.३० या अवघ्या एका तासाच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश करत लोखंडी पेटीचा कोंडा वाकवून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी जानेफळ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध २० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव साखरशा येथील रहिवासी सुरेश रामचंद्र नवत्रे (वय ५५) हे घराबाहेर गेले असताना चोरट्याने संधी साधत घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटीचा कोंडा वाकवून चोरट्याने सोन्याची अंगठी, सोन्याची एकदाणी, चांदीचे कडे तसेच रोख रक्कम असा एकूण ७४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. मात्र सदर दागिन्यांची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत जवळपास चार लाख रुपयांच्या आसपास असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याची अंगठी (३ ग्रॅम ९७० मिली), सोन्याची एकदाणी (४० मणी, वजन २० ग्रॅम १९० मिली), चांदीचे कडे (वजन २०० ग्रॅम ४६० मिली) तसेच १० हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. चोरीचा प्रकार उघडकीस येताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. बुलढाणा येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातून सोनोने, ईरफानभाई यांच्यासह कर्मचारी आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञांनी घरातील विविध ठिकाणी तपास करत संभाव्य पुरावे संकलित केले.

या घटनेनंतर ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. “चोरीचा कसून तपास सुरू असून, अज्ञात आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि मिळालेल्या ठशांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत.

या प्रकरणी सुरेश रामचंद्र नवत्रे यांच्या तक्रारीवरून जानेफळ पोलिस ठाण्यात अप. क्र. ११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोका लक्ष्मण पिटकर करीत असून, पोका विष्णू जगताप हे देखील तपासात सहभागी आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून तपास कार्य सुरू ठेवले होते.

दरम्यान, या घटनेमुळे देऊळगाव साखरशा परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीचा लवकरच उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.