ओल्या शिवारात दडलेला घातक धोका…

सोयाबीन शेतकऱ्यांवर नवे संकट…!

बाळापूर:सततधार पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. खिरपूरी शिवारात आयोजित कार्यशाळेत कृषी विभाग व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले.

रोगांचा प्रादुर्भाव

सतत ओलसर हवामानामुळे एरियल ब्लाईटयलो मोझाईक या बुरशींचा फैलाव होत आहे. फक्त दहा दिवसांत संपूर्ण शेत बाधित होण्याचा धोका असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. याशिवाय कपाशी पिकालाही ‘मर रोगा’चा धोका संभवतो.

उपाययोजना

तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना तातडीने बुरशीनाशक फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात —

  • पायरोक्लोस्ट्रोबीन (२०% डब्लूजी) : १ ग्रॅम (किंवा ३७५-५०० ग्रॅम प्रति हेक्टर)

  • फ्लुक्सापायरोक्साड + पायरोक्लोस्ट्रोबीन (संयुक्त बुरशीनाशक) : ०.६० मिली (किंवा ३०० मि.लि. प्रति हेक्टर)

  • पायरोक्लोस्ट्रोबीन + इपॉक्सिकोनॅझोल : १.५ मिली (किंवा ७५० मि.लि. प्रति हेक्टर)

शेतकऱ्यांचे नुकसान

खिरपूरी शिवारातील शेतकरी सुरेश रामकृष्ण मेहरे, दत्ता वासुदेव जामोतकार, निलेश बळीराम कवडकर, निवृत्ती मार्तंड आखरे यांच्या सोयाबीन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला.

तज्ज्ञांची उपस्थिती

या वेळी मा. प्रकाश घाटोळ (पं. कृ. वि. विद्यापीठ शास्त्रज्ञ), सागर डोंगरे (तालुका कृषी अधिकारी), धनभर (मंडळ अधिकारी), शलाका महाले (कृषी सहाय्यक) यांनी बाधित शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन उपाययोजना सांगितल्या.

 शेतकऱ्यांनी वेळेत फवारणी केल्यास मोठे नुकसान टाळता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.