मुंबई : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमागील शुक्लकाष्ट काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. कंपनीने अलिकडेच आपल्या टू-व्हीलरबाबत आलेल्या 10,644 तक्रारींपैकी 99.1 टक्के तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा केला होता. याबाबत कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता केंद्रिय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या या दाव्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कंपनीचा पाय आणखीनच खोलात जाणार आहे.
ओला इलेक्ट्रिकने स्वतः आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले होते की, कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून नोटीस मिळाली आहे. 15 दिवसांच्या आत या नोटीशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. 21 ऑक्टोबर 2024 रोजी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, ओला इलेक्ट्रिककडे वाहनांबाबत ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणा आहे. आम्ही सूचित करू इच्छितो की, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या एकूण 10,644 तक्रारींपैकी 99.1 टक्के तक्रारींचे निराकरण ओला इलेक्ट्रिकच्या मजबूत निवारण यंत्रणेच्या अंतर्गत ग्राहकांच्या पूर्ण समाधानासाठी करण्यात आले आहे.