मुंबई, ९ सप्टेंबर – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगें पाटील यांनी राज्य शासनाला जोरदार इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारने जीआरमध्ये कोणतीही नवीन तरतूद करायची नाही आणि काढायचीही नाही. जर काही गडबड झाली, तर महाराष्ट्र बंद करणार आणि कायदा सुव्यवस्था पाहणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
मनोज जरांगें पाटील यांनी खासगी समारंभात छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट हल्लाबोल करत म्हटले, “जर सरकारने हैद्राबाद गॅझेटच्या जीआरविरोधात काही पावलं उचलली तर आम्ही १९९४ च्या जीआरला चॅलेंज करणार. कारण ओबीसीच्या १६ टक्के आरक्षणावर कुठलाही आघात सहन करणार नाही.”
जरांगें पाटील म्हणाले, “या आरक्षणाला मराठ्यांच्या वाट्याचा भाग मानणं चुकीचं आहे. आमच्या अधिकाराला कोणताही बदल करायचा नाही. जर काही बदल करण्याचा प्रयत्न झाला तर राज्यभर रस्ते बंद करून विरोध केला जाईल.”
त्यांनी विनोद पाटील यांच्यावरही टीका करत म्हटले, “आमच्या समाजातील लोक काहीच दिलेले नाहीत, फक्त कोर्ट कागद आणि मंत्री भेटी करत बसले आहेत. आम्ही आंदोलनातून मिळवलेले आरक्षण त्यांना बघवत नाही, त्यामुळे यांची वळवळ सुरु आहे.”
मनोज जरांगें पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोणतीही बैठक घेऊन काही निर्णय करण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या आरक्षणाच्या निर्णयात बदल नाही.”
ही वक्तव्ये राज्यात सामाजिक व राजकीय वातावरणात तणाव निर्माण करणारी ठरत आहेत. भविष्यात काय पावले उचलली जातील, हे पुढील काळात समजून येईल.
