अकोला | प्रतिनिधी – अकोट फाईल पोलिसांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन चायनीज मांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. २८ डिसेंबर २०२५ रोजी अकोट फाईल येथील शंकर नगर परिसरात पोलीस निरीक्षक रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून अभय देवानंद भोसले (१९) या आरोपीच्या ताब्यातून ‘ब्लॉक फायटर’ लेबल असलेले काळ्या रंगाचे ३३ नग नायलॉन मांजा जप्त केले. प्रत्येकाची किंमत १ हजार २०० रुपये असून, एकूण ३९,६०० रुपये मूल्याचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
नायलॉन चायनीज मांजा नागरिकांसाठी, दुचाकी वाहनचालकांसाठी, पादचारी व पशुपक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक असून, त्याचा वापर गंभीर दुखापती आणि जीवितहानीस कारणीभूत ठरतो. शासनाने त्यामुळे यावर बंदी घालली आहे, तरीही आरोपीने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर विक्री सुरू ठेवली होती.
या प्रकरणी अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ६१६/२५ अंतर्गत भारतीय दंडसंहिता कलम ११०, २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे कलम ४, ५, १५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले गेले आहे. पुढील तपास पो. उपनि. अख्तर शेख करत आहेत.
Related News
अकोट फाईल आणि जिल्ह्यातील अनेक दुचाकी चालक, पादचारी व पशुपक्ष्यांना नायलॉन मांजामुळे आधीच गंभीर दुखापती झाल्या असून काहींना जीवितहानी देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, सेवाभावी संस्था व माध्यमांमार्फत जनजागृती सुरू असतानाही बेकायदेशीर विक्री सुरू असल्याने पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बदेली रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रहीम शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, पो. उपनि. अख्तर शेख, पो. हवा. प्रशांत इंगळे, पो. हवा. हर्षल श्रीवास, पोका. ईमरान शाह, पोका. अमिर व पोका. लिलाधर खंडारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सदर प्रकरण नागरिकांसाठी चेतावणी ठरते; शासनाच्या बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासन सतत लक्ष ठेवत असून, सुरक्षिततेसाठी जनजागृती व कडक कारवाईचा संपूर्ण परिसरात परिणाम होत असल्याचे अधिकारी सांगतात.
read also : https://ajinkyabharat.com/maitricha-maha-kumbh-after-30-years-school-filled-in-shendurjan/
