नवी मुंबई: न्हावा शेवा बंदरात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानातून आयात केलेल्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वस्तू जप्त केल्या आहेत. तपासात हे समोर आले आहे की पाकिस्तानातून आलेल्या 28 कंटेनरमध्ये एकूण 800 मेट्रिक टन पाकिस्तानी मूळचे सौंदर्यप्रसाधने आणि खजूर भरलेले होते. या वस्तूंची अंदाजे किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने ही कारवाई “ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट” अंतर्गत केली असून, या प्रकरणात दुबईतील एका भारतीय पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे. तो बनावट बिल तयार करून पाकिस्तानातून खजूर भारतात पाठवत होता. या रॅकेटमध्ये पाकिस्तान, भारत आणि युएईचे नागरिक सामील असल्याचेही उघड झाले आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, हा माल पाकिस्तानातून थेट भारतात येत नसून प्रथम दुबईच्या जेबेल अली बंदरात पाठवला जात होता आणि नंतर भारतात ट्रान्सशिपमेंट केलं जात होतं. विशेष बाब म्हणजे दुबईचा लेबल असलेला माल प्रत्यक्षात पाकिस्तानचा होता.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने व खजूरची कन्साइनमेंट मंजूर केली जात होती. या संदर्भात कस्टम ब्रोकरलाही ताब्यात घेतलं गेलं आहे.
याआधी जुलै 2025 मध्ये “ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट” अंतर्गत डीआरआय मुंबईने 39 कंटेनरमध्ये 1115 मेट्रिक टन बेकायदेशीर माल जप्त केला होता, ज्याची किंमत सुमारे 9 कोटी रुपये होती. या कारवाईत एका आयातदाराला अटक देखील करण्यात आली होती.
डीआरआयचे अधिकारी म्हणतात की, सरकारच्या निर्बंधांना उलथून लावून अनेक आयातदार आजही बेकायदेशीर पद्धतीने माल भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशी कारवाई नियमितपणे केली जात राहणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/uddhav-thakarancha-sarkarwar-tola/