स्लग:-आईच्या डोळ्यासमोरून नवजात बाळाचे अपहरण ?
स्लग:- आईने उपसले उपोषणाचे हत्यार
विठ्ठल महल्ले
अकोला:-
बाळाच्या जन्मानंतरच्या आनंदाच्या क्षणांना दहशतीचे सावट! आईचे दूध पाजण्याचाही हक्क हिरावून घेत,
नवजात बालकाला जबरदस्तीने आईपासून वेगळे केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात समोर आली आहे.
संपूर्ण प्रकरणात वैद्यकीय संस्था, पती, व पोलिस प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
बाळापासून जबरदस्तीने वेगळी करण्यात आलेली मेहरा बानो मोहम्मद शाकीब या पीडित
महिलेने थेट अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात धाव घेतली असून,
न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
मेहरा बानो या मूळच्या बाळापुर येथील महिला असून,
त्यांचा विवाह मूर्तिजापुरातील मोहम्मद शाकीब मो. आशद यांच्याशी झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी गर्भवती असताना पतीने अत्याचार केल्याची तक्रार त्यांनी मूर्तिजापूर पोलिस स्टेशनमध्ये केली होती.
त्यानंतर त्या माहेरी बाळापुर येथे राहत होत्या.
२५ जुलै रोजी त्यांनी देवकी हॉस्पिटल येथे एका मुलाला जन्म दिला. काही वेळातच बाळाला निमोनियाची लागण
झाल्यामुळे डॉ. पार्थसार्थी शुक्ल यांच्या शुक्ल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
तेथे उपचार चालू असताना मेहरा बानो स्वतः त्याच हॉस्पिटलमध्ये थांबून बाळाला आईचे दूध पाजत होत्या.
या दरम्यान पती मोहम्मद शाकीब हॉस्पिटलमध्ये येत होता, मात्र तो सातत्याने शिवीगाळ व धमक्या देत होता.
“बाळाजवळ उभी राहू नकोस”, “दूध पाजू नकोस, मी पावडरचे दूध देईन” अशा धमक्यांमुळे पीडित महिलेने रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पण दुर्दैवाने, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.यानंतर ४ ऑगस्ट रोजी पीडित महिलेच्या माहितीनुसार,
तिच्या संमतीशिवाय पतीने डॉ. पार्थसार्थी शुक्ल यांच्या संगनमताने नवजात बालकाला जबरदस्तीने मूर्तिजापुर येथे नेले.
याबाबतही तिने तक्रार दिली असली, तरी पोलिसांनी ती धुडकावून लावल्याचे आरोप आहेत.
बालक आदलाबदल प्रकरणी डॉक्टर शुक्ल यांच्यावर काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप झाले होते प्रकरण खूप विकोपाला गेले होते.
या प्रकरणाने पुन्हा त्या घटनेला उजाळा मिळतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
—आईचे आरोग्य धोक्यात, बाळाच्या जीवाला धोका
सिजेरियन शस्त्रक्रियेमुळे आईला विश्रांतीची गरज असतानाही, बाळाला गमावल्याचा मानसिक
आघात व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ती पूर्णपणे कोलमडली आहे. तिचे म्हणणे आहे की,
“आई व बाळ यांना विभक्त करता येत नाही. माझ्या बाळाला आईचे दूध गरजेचे आहे.
त्याचा जीवही धोक्यात आहे.”
—विधी व न्यायव्यवस्थेच्या तरतुदींनुसार…
वार्ड आणि गार्डियन कायद्यानुसार, ६ वर्षांखालील बाळाचा प्राथमिक ताबा हा आईकडेच असतो.
तरीसुद्धा, पोलीस व दवाखान्याच्या भूमिकेकडे लक्ष वेधले जात आहे.
—आईचा उपोषणाचा इशारा
या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात लेखी निवेदन देऊन,
“माझे बाळ परत मिळेपर्यंत मी उपोषणाला बसणार” असा इशारा दिला आहे.
यासोबतच महिला व बालकल्याणण समितीकडेही याच आशयाची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.
—प्रशासन काय पावले उचलते?
हे संपूर्ण प्रकरण केवळ एका आईच्या भावनिक वेदनांचे प्रतीक नाही, तर कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी,
महिला सुरक्षा, बालहक्क, व आरोग्य व्यवस्थेतील गंभीर स्वरूपाच्या निष्काळजीपणाचेही द्योतक ठरत आहे.
आता प्रशासन व पोलिस यंत्रणा यातून बोध घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करणार का, हाच खरा प्रश्न आहे.—
“…कोट
प्रथमदर्शनी हे प्रकरण पती-पत्नीतील वादातून उद्भवलेले दिसते. प्रसूतीनंतर उपचारासाठी बाळाला डॉ. पार्थसारथी शुक्ल
यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मातेची प्रकृती बिघडल्याने तिला
अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २८ जुलै रोजी तिला त्या रुग्णालयातून सुटीही मिळाली.
परंतु ती आपल्या नवजात बाळाकडे परतली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सदर बालक त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.
मंगळवारी संबंधित महिला पोलीस ठाण्यात येऊन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करते.
या प्रकरणी आम्ही दोघांचेही भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिले आणि हे प्रकरण सामंजस्याने सोडवावे, असा सल्ला दोघांनाही दिला.
– शैलेष खंडारे
पोलीस निरीक्षक, रामदासपेठ पोलीस ठाणे
–“…कोट
एक महिला नवजात बालकासह आठ दिवसांपूर्वी आमच्या रुग्णालयात दाखल झाली होती.
सदर महिलेचे सिझेरियन ऑपरेशन झाल्यामुळे ती अन्य रुग्णालयात उपचार घेत होती.
दरम्यान, वेळोवेळी नवजात बालकाचे वडीलच आमच्याशी संपर्कात होते.
यावेळी आम्ही त्यांच्या पत्नीबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, “माझ्या पत्नीला बंगला आणि फोरव्हीलर गाडी हवी आहे,
तसेच तिला माझे आई-वडील जवळ नको आहेत,” यामुळे ती बाळाला स्वीकारण्यास तयार नाही.
बालकाला निमोनिया झाला होता. त्याच्यावर उपचार करून तो बरा झाल्यानंतर आम्ही त्याला सुटी दिली आणि त्याचे वडील त्याला घेऊन गेले.
आमची भूमिका केवळ वैद्यकीय उपचारापुरती मर्यादित होती. संपूर्ण प्रकार पती-पत्नीमधील वादातून घडलेला असावा, असे मला वाटते.
– डॉ. पार्थसारथी शुक्ल
बालरोगतज्ज्ञ, अकोला
Read Also : https://ajinkyabharat.com/balhadi-gavat-facility-lack-15-august/