प्रतिनिधी – संदीप सावळे
सणासुदीच्या दिवसांत गावातल्या गल्ल्या, वाड्यांचे आंगण, देवळाच्या जागा आणि शाळांच्या पटांगणात गगनाला भिडणारे झोके
हेच नागपंचमीचे खरे वैशिष्ट्य होते. पण आज तीच नागपंचमी झोके परंपरा लुप्त होत चालली आहे.
आधुनिकतेच्या वादळात पारंपरिक खेळ आणि सण साजरे करण्याची पद्धत हरवू लागली आहे.
नागपंचमी हा सण म्हणजे स्त्रियांसाठी पारंपरिक फेरगाणी, मुलांसाठी झोके, आणि संपूर्ण गावासाठी उत्सवाचा दिवस असायचा.
झाडांवर दोर बांधून, बाभळी किंवा बाभुळाच्या खांबांवर पारंपरिक झोके तयार केले जात.
झोके झुलताना स्त्रियांची फेरगाणी, मुलींच्या हातातील फुलांचे हार,
आणि पारंपरिक गीतांची गूंज – या सर्व गोष्टींनी गावातील नागपंचमीला एक वेगळीच शोभा यायची.
मात्र आजच्या घडीला ही परंपरा फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणीत आणि जुन्या फोटोंपुरतीच मर्यादित राहिली आहे.
झोके झुलवणारी मुलं आता मोबाइलमध्ये रमली आहेत. झाडांच्या जागी सिमेंटची इमारती,
आणि मोकळ्या जागांवर प्लॉटिंग झालेली पाहायला मिळते. परिणामी झोके लावण्यास जागाच राहिलेली नाही.
” संस्कृती आणि सामाजिक संवाद हरवत आहे”.
पूर्वी या झोक्यांतून केवळ खेळ नव्हे तर सामाजिक संवाद, मैत्री, आणि सांस्कृतिक जपणूक घडत असे.
मुलींचा आपापसात संवाद, स्त्रियांची सांस्कृतिक गाणी, आणि मुलांचं एकत्र खेळणं यामधून समाजात एक वेगळं नातं तयार व्हायचं.
आता मात्र घराघरात टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटमुळे हे सर्व हरवताना दिसते.
नागपंचमीचे झोके हे आपल्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक होते. त्यांचे लुप्त होणे म्हणजे आपल्या इतिहासाला विसरण्यासारखे आहे.
वेळेत जागरूक होऊन नव्या पिढीला या परंपरेची ओळख करून देणं ही आपली सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारी आहे.