मुंबई – मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे
यांनी आंदोलकांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.
“आमची भूमिका ठाम आहे. आंदोलकांना राजकारणाचं भान नसतं,
त्यांच्याकडचं अन्न-पाणी संपलंय. ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
मुंबईत कुठेही मराठा बांधवांना एकटं वाटू देणार नाही, त्यांना मदत करणार”, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज ठाकरे फडणवीसांसोबत गेले यावर मनोज जरांगे यांनी टीका केली होती.
त्यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं – “आमची भूमिका बदललेली नाही.
ज्यांनी आश्वासन दिलं होतं, त्यांना प्रश्न विचारायला नको का? आंदोलक परत परत का येतात?
तुम्ही कोणाला मूर्ख बनवता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारवरही टीका करत अमित ठाकरे म्हणाले –
“आंदोलनामुळे लोकलला त्रास होतोय, पण त्याचं उत्तर सरकारने द्यावं.
आंदोलकांचं म्हणणं ऐकून सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा.”
यावेळी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले –
“दरवेळी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवता.
यावेळी आलात तर जे काही उत्तर आहे, ते घेऊन जा.
आरक्षण दिलं तर शिक्षण-नोकरीत ते कसं लागणार, याचं उत्तर सरकारने स्पष्ट करावं.”
फडणवीसांवर होत असलेल्या आरोपांवर ते म्हणाले –
“ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कुठेही तेढ निर्माण व्हावी अशी त्यांची अजिबात इच्छा नाही.
योग्य तो निर्णय ते घेतील.”