पातुर तालुक्यातील विवरा परिसरात 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. पिके पिवळी पडली असून सोयाबीनच्या शेंगा गळत आहेत. काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि कर्जफेड यांसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. शेतकरी रमेश धोत्रे म्हणाले, “26 आणि 27 तारखेला झालेल्या पावसामुळे आमच्या शेती पिकांसह जमीनसुद्धा खरडून गेली आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे निघून गेला. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी.” शेतकरी वर्ग सध्या हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे आणि सरकारच्या मदतीकडे आशेने पाहत आहे. राज्य शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांची आर्त हाक: “ओला दुष्काळ जाहीर करा, आम्हाला जगू द्या!”
read also:https://ajinkyabharat.com/entertainment-vishwat-mourning/
