कोर्टाचा सरकारला सवाल : “रस्त्यावर रोज 50 हजार लोक फिरत होते, तुम्ही काय करत होता?”
मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.
यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले.
“रस्त्यावर रोज 50 हजार लोक फिरत होते, त्यावेळी तुम्ही काय करत होता?
योग्य पावलं वेळीच का उचलली नाहीत?” असा थेट सवाल कोर्टाने सरकारला केला.
आज दुपारी ३ वाजता झालेल्या सुनावणीदरम्यान महाधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडताना सांगितले की,
पोलिस सातत्याने लाऊडस्पीकरद्वारे सूचना करत आहेत.
आंदोलकांना जागा खाली करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मात्र लोक अजूनही त्या परिसरात थांबले आहेत.
जरांगे यांनी लिखित स्वरुपात आवाहन केल्यास परिणामकारक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाधिवक्त्यांनी पुढे सांगितले की, “आंदोलक तिथेच राहिले तर अडचण होईल.
तरीही पोलिसांनी कुठलीही कठोर कारवाई केलेली नाही.
कारण गणेशोत्सवाचा काळ असल्याने काळजीपूर्वक पावलं उचलत आहोत.”
यावर न्यायालयाने सरकारला सुनावले की, “तुम्ही तत्काळ कोर्टात का आला नाहीत?
ही तुमची जबाबदारी होती. आम्ही तुमच्याविरोधातही आदेश देऊ शकतो.”
न्यायालयाने मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
दरम्यान, आदेशानंतर पोलिसांनी रस्ते खाली करण्यास सुरुवात केली आहे.
आंदोलकांशी समन्वय साधत, “आम्ही सहकार्य करतो, तुम्हीही करा,”
असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
आंदोलकांकडून मात्र “जेवणाच्या गाड्या जागेवर ठेवाव्यात,” अशी मागणी पुढे आली आहे.