मोरणा नदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, ग्रामस्थांचा रोष

‘पत्र नाही तोपर्यंत मतदान नाही’

मोरणा नदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, ग्रामस्थांचा रोष – ‘पत्र नाही तोपर्यंत मतदान नाही’

सोनाळा : अंदुरा, सोनाळा व बोरगाव वैराळे परिसरातील ग्रामस्थांचा दररोजचा प्रवास अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. मोरणा नदीवरील पूल अपुरा आणि कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात दरवर्षी ग्रामस्थांना असह्य हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शेतमालाचे प्रचंड नुकसान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, आजारपणात रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेता न येणे, वयोवृद्धांना औषधोपचारांपासून वंचित राहावे लागणे – या सर्व गंभीर अडचणींनी नागरिकांचे जीवन थांबून राहिले आहे.ग्रामस्थांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले होते; मात्र आजतागायत ठोस तोडगा निघालेला नाही. परिणामी, ग्रामस्थांचा रोष पुन्हा उफाळून आला आहे.

ग्रामस्थांचा ठाम निर्णय

  • पुलाची उंची वाढवण्याचा अधिकृत निर्णय व पत्र हाती येईपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान होणार नाही.

  • हा बहिष्कार कायमस्वरूपी असेल.

  • हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून, गावकऱ्यांचा एकहाती निर्णय आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी यांचा गवगवा करीत असताना आम्हाला अजूनही दोरी धरून नदी पार करावी लागते. हा फक्त पुलाचा नव्हे तर जगण्याचा प्रश्न आहे.”ग्रामस्थांचे आरोप आहेत की आंदोलने, उपोषणे, निवेदने यानंतरही आमदार-खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधी गप्प आहेत. “पावसाळ्यात या पुलावरून कधी सत्ताधाऱ्यांनी प्रवास करून पाहिला आहे का?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

ग्रामस्थांच्या वेदना ठळकपणे

  • शेतमाल बाजारात पोहोचत नाही; शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान

  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

  • रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही

  • वयोवृद्धांना औषधे मिळत नाहीत

  • गावांचा विकास ठप्प

ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहेप्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही, तर संतापाची ही ज्वाला अधिक प्रखर होणार असून त्याचे राजकीय परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील.