अकोला महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी तर अमोल गोगे यांची उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून भाजपवर गंभीर आरोपांचा भडिमार सुरू केला आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या हातात घेतली. भाजपला एकूण 45 मते मिळाली, तर ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त आघाडीला 32 मते मिळाली. त्यामुळे भाजपने 13 मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले, हे विशेष ठरले.
भाजपच्या या विजयानंतर ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी भाजपवर थेट आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. भाजपने बहुमत मिळवण्यासाठी नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांची आमिषे दिल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. तसेच मुस्लिम नगरसेवकांच्या आशीर्वादानेच भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आरोपही त्यांनी केला.
Related News
साजिद खान पठाण यांनी पुढे बोलताना, “भाजप जाहीरपणे मुस्लिम समाजाच्या विरोधात राजकारण करते. मात्र सत्तेसाठी त्यांनाच जवळ केल्याचं चित्र अकोला महापालिकेत दिसत आहे. नगरसेवकांना कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन, तसेच अकोल्याच्या भाजी बाजारात प्रत्येकाला दुकान देण्याचे आश्वासन देत सत्ता हस्तगत करण्यात आली,” असा आरोप केला. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. “निवडणुकांपूर्वी भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे नारे दिले जात होते. मात्र सत्ता मिळवण्यासाठी याच भाजपने मुस्लिम नगरसेवकांवरच अवलंबून राहण्याचा मार्ग स्वीकारला,” असा आरोप देशमुख यांनी केला. अकोटमध्ये आधी आणि आता अकोला महापालिकेत एमआयएमसोबतची भाजपची भूमिका स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही भाजपवर टीका करत, “हा विजय लोकशाही मूल्यांना धरून नाही. पैसा, दबाव आणि सत्तेचा गैरवापर करून सत्ता मिळवण्यात आली आहे,” असा आरोप केला. महापालिकेतील सत्ता बदलाचा परिणाम शहराच्या विकासावर होणार असून, अशा पद्धतीने मिळवलेली सत्ता जनतेच्या विश्वासाला तडा देणारी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, भाजपकडून या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी हे आरोप निराधार आणि राजकीय सूडभावनेतून करण्यात आले असल्याचे सांगत, “महापालिकेतील विजय हा लोकप्रतिनिधींच्या विश्वासावर आधारित आहे. कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत,” असा दावा केला आहे.
एकीकडे भाजपच्या विजयानंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी दुसरीकडे विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांमुळे अकोला महापालिकेचे राजकारण आगामी काळात अधिक तापण्याची शक्यता आहे. या आरोपांवर पुढे काय कारवाई होते आणि राजकीय संघर्ष कोणत्या दिशेने जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akanksha-awasthi-fraud-case/#google_vignette
