न्यूयॉर्कमधील लागुआर्डिया विमानतळ येथे घडलेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण जग हादरले आहे. Air Canada च्या विमानाने लँडिंगनंतर अग्निशमन दलाच्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि या अपघातात दोन्ही पायलट्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या दुर्घटनेत एक अशी घटना घडली, जी अक्षरशः ‘चमत्कार’ म्हणूनच ओळखली जात आहे.
या अपघातात फ्लाइट अटेंडंट Solange Tremblay या सीट बेल्ट लावलेल्या अवस्थेत असूनही तब्बल 330 फूट दूर फेकल्या गेल्या, तरी त्यांचा जीव वाचला. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्ट्रियलहून निघालेलं एअर कॅनडाचं CRJ-900 विमान न्यूयॉर्कमध्ये लँड झाल्यानंतर काही क्षणांतच हा अपघात झाला. विमानाचा वेग त्या वेळी सुमारे 40 किमी प्रतितास होता.धावपट्टीवरून जात असताना विमानाने अग्निशमन दलाच्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा ट्रक एका अन्य विमानातून येणाऱ्या विचित्र वासाच्या तपासासाठी धावपट्टी ओलांडत होता. विशेष म्हणजे, या ट्रकला आधीच परवानगी देण्यात आली होती.धडकेनंतर विमानाचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला आणि काही क्षणांसाठी हवेत उचलला गेला. या भीषण धडकेत दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले
Related News
330 फूट दूर फेकल्या गेल्या, तरीही जीव वाचला!
या अपघातातील सर्वात धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे फ्लाइट अटेंडंट सोलांज ट्रेमब्ले यांचा बचाव.अपघाताच्या वेळी त्या आपल्या सीटवर बसलेल्या होत्या आणि त्यांनी सीट बेल्ट घट्ट लावलेला होता. मात्र धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्या थेट 330 फूट दूर फेकल्या गेल्या.अपघातानंतर बचाव पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्या अजूनही सीटला बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. इतक्या मोठ्या अपघातानंतरही त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली. त्यांच्या एका पायाला फ्रॅक्चर झालं असलं तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
“हे सर्व आकलनापलीकडचं आहे”
सोलांज ट्रेमब्ले यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “माझ्यासोबत नेमकं काय घडलं, हे अजूनही समजलेलं नाही. हे सर्व आकलनापलीकडचं आहे.”त्यांच्या कुटुंबीयांनीही माध्यमांशी बोलताना या घटनेला ‘चमत्कार’ म्हटलं आहे. त्यांच्या मुलीने सांगितलं की, इतक्या मोठ्या अपघातातून आई सुरक्षित बाहेर आली, हे विश्वास बसणारं नाही.
अपघातामागील कारण अद्याप अस्पष्ट
या अपघातामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. धावपट्टीवर ट्रक आणि विमान एकाच वेळी कसे आले, याबाबत तपास सुरू आहे.एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुर्मिळ असतात आणि यामध्ये समन्वयातील त्रुटी, संप्रेषणातील गोंधळ किंवा मानवी चूक कारणीभूत असू शकते.सध्या संबंधित यंत्रणा या अपघाताची सखोल चौकशी करत असून, लवकरच अधिकृत अहवाल समोर येण्याची शक्यता आहे.
प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
या अपघातामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं.या घटनेनंतर विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मात्र तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे की, विमान प्रवास अजूनही जगातील सर्वात सुरक्षित प्रवास पद्धतींपैकी एक आहे.
न्यूयॉर्कमधील या भीषण अपघाताने विमान सुरक्षेच्या व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण केला आहे. मात्र सोलांज ट्रेमब्ले यांचा चमत्कारिक बचाव हा या दुर्घटनेतील एक सकारात्मक आणि आश्चर्यकारक पैलू ठरला आहे.सीट बेल्ट लावल्यामुळेच त्यांचा जीव वाचल्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, सुरक्षेच्या नियमांचं पालन किती महत्त्वाचं आहे.
read also : https://ajinkyabharat.com/bhondubaba-ashok-kharatchi-police-kothadi-extended-till-29th-march/
