तिरुअनंतपुरम :कोरोनाहूनही भयंकर आजाराने केरळसह देशातील आरोग्य यंत्रणांची झोप उडवली आहे. नेग्लेरिया फाऊलेरी (Naegleria Fowleri) नावाचा हा सूक्ष्मजंतू सामान्य भाषेत मेंदू खाणारा अमिबा म्हणून ओळखला जातो. या अमिबामुळे होणाऱ्या PAM (Primary Amoebic Meningoencephalitis) या संसर्गाने आतापर्यंत राज्यात 19 जणांचा बळी गेला आहे, तर तब्बल 61 रुग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हा अमिबा मानवी मज्जासंस्थेवर आघात करतो. तो मेंदूच्या ऊतींना नष्ट करतो, ज्यामुळे गंभीर सूज येते आणि अखेरीस मृत्यू ओढावतो. हा आजार दुर्मीळ असला तरी अतिशय घातक आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये याचा प्रादुर्भाव लहान मुलं, किशोरवयीन बालकं, तरुण तसेच वृद्धांमध्येही मोठ्या प्रमाणात होत आहे.
कसा पसरतो हा आजार?
नेग्लेरिया फाऊलेरी हा अमिबा तलाव, धरणे आणि सांडव्यातील ताज्या पाण्यात आढळतो.
दूषित पाण्याशी संपर्क आल्यावर तो नाकावाटे शरीरात प्रवेश करतो.
तलाव, सांडव्यात आंघोळ करणे किंवा गरम पाण्यात जाणे यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
सध्या तरी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत हा रोग पसरत असल्याचे निदर्शनास आलेले नाही.
लक्षणं कोणती?
या आजाराची सुरुवातीची लक्षणं सामान्य असल्याने धोक्याची जाणीव उशिरा होते.
तीव्र डोकेदुखी
ताप, मळमळ आणि उलटी
सर्दीसारखी लक्षणं
सामान्य वाटणारी ही लक्षणं दुर्लक्षित केल्यास मोठा धोका निर्माण होतो. उपचारात उशीर झाल्यास मृत्यू टाळता येत नाही.
घ्यावी लागणारी काळजी
आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की—
तलाव, सांडव्यात किंवा दूषित पाण्यात आंघोळ करू नये.
गरम व दूषित पाण्याशी संपर्क टाळावा.
वरील लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
महाराष्ट्रात या आजाराची मोठ्या प्रमाणावर प्रकरणं अद्याप समोर आलेली नाहीत. तरीही खबरदारी म्हणून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
read also :https://ajinkyabharat.com/ingrji-value-sports-first/
