पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
त्यातच आता मुंबईतील डॉक्टरांनी मेंदूला प्रभावित करणाऱ्या टेपवर्म किंवा न्यूरोसिस्टीसर्कोसिस संसर्गाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे.
हा असा संसर्ग आहे जो परजीवी टेनिया सोलीयम (T.solium) च्या अळ्यांमुळे होतो.
त्यांना डुकराचे टेपवर्म असेही म्हणतात. या घटनेनंतर मेंदूमध्ये सिस्ट्स म्हणजेच गाठी तयार होऊ शकतात.
मुंबईतील एका रुग्णालयाने असा सल्ला जारी केला आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये,
विशेषतः महानगरांमध्ये टेपवर्म संसर्गामध्ये वाढ दिसून आली आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि सीडीसीनुसार, हा एक परजीवीजन्य रोग आहे.
परंतु, असे असले तरीही अस्वच्छता आणि जनजागृतीच्या अभावामुळे हा रोग अजूनही सामान्य आहे.
मेंदूत अळ्या कशा होतात? त्याची लक्षणे आणि उपाय काय आहेत? जाणून घेऊयात.
मुंबईतील डॉक्टरांनी मेंदूला प्रभावित करणाऱ्या टेपवर्म किंवा न्यूरोसिस्टीसर्कोसिस संसर्गाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे.
न्यूरोसिस्टीसर्कोसिस हा टेनिया सोलीयम म्हणजेच डुकराच्या टेपवर्ममुळे होणारा एक गंभीर मेंदूचा संसर्ग आहे.
अस्वच्छता असलेल्या ठिकाणी आणि डुकराच्या मांसाचे सेवन होत असलेल्या ठिकाणी या आजाराचा संसर्ग होणे सामान्य आहे.
न्यूरोसिस्टीसर्कोसिस हा आजार डुकराच्या टेपवर्मची अंडी खाल्ल्याने होतो.मुंबईमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे काय?
मुसळधार पावसामुळे अनेकदा मलनिस्सारण प्रणाली (सेवेज सिस्टम) भरून वाहतात आणि त्यामुळेच मानवी विष्ठा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळते;
त्यामुळे मानवी विष्ठांमधून पसरणाऱ्या टेनिया सोलीयम अंड्यांमुळे पाणी किंवा अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो.
अनेक ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टी भागात पावसाळ्यात शौचालये भरून वाहतात किंवा उघड्यावर शौचाचे प्रमाण वाढते.
अस्वच्छ परिस्थितीमुळे दूषित हात, अन्न किंवा पृष्ठभागांद्वारे या अंड्यांचा प्रसार होण्यास मदत होते.
पावसाळ्यात लोक रस्त्यावरचे गरम पदार्थ म्हणजेच स्ट्रीट फूड खाणे पसंत करतात, परंतु अनेकदा हे पदार्थ अस्वच्छ वातावरणात आणि दूषित पाण्याने तयार केले जातात.
पूर-दूषित पाण्यात धुतलेल्या पालेभाज्यांमध्येदेखील ही अंडी असू शकतात. जर या भाज्या कच्च्या किंवा अपुऱ्या शिजवलेल्या खाल्ल्या तर संसर्गाचा धोका वाढतो.
पावसाळ्यात सामान्यतः परजीवी आणि जलजन्य रोगांचा प्रसार वाढतो. त्यात अमिबियासिस, गियार्डियासिस आणि इतर जीवाणूंचा समावेश आहे.
हे जीवाणू रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतात आणि त्यामुळे न्यूरोसिस्टीसर्कोसिस झाल्यास त्याचा सामना करणे अधिक कठीण होते.