बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश !

– बंडखोर उमेदवार बदलणार महाराष्ट्राचं राजकारण?

मुंबई :  महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक आलं आहे. महाविकास आघाडीत ठिकठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी अटोक्यात आणू असा दावा मविआचे नेते करत होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश आलं. त्यामुळं मविआला बंडोबा त्रासदायक  ठरणार आहेत. महाविकास आघाडीतली बंडखोरी शमून जाईल असा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला होता. पण वस्तूस्थिती मात्र वेगळीच दिसू लागली आहे. महाविकास आघाडीत बंडोबांचा झेंडा कायम असल्याचं उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झालं. काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सलील देशमुखांना काँग्रेसच्या याज्ञवल्क्य जिचकार यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिलंय. पुण्यात कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना बंडखोर कमल व्यवहारेंनी आव्हान दिलंय. पुण्यातल्याच पर्वतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अश्विनी कदम या उमेदवार असताना काँग्रेसच्या आबा बागुल यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटलेत. शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना बंडखोर मनिष आनंद यांनी आव्हान दिलंय. सावनेर विघानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अनुजा केदार यांच्याविरोधात काँग्रेसचेच अमोल देशमुख यांनी आव्हान दिलंय. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिलीय आहे. नाना पटोले तर बंडखोरांच्या संपर्कात असल्याचं म्हणत होते. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्यांना काँग्रेसच्या बंडखोरांनी गुलीगत धोका दिलाय. एवढंच नव्हे तर विदर्भातही ठिकठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केली. बंडखोरांवर फक्त हकालपट्टीची कारवाई करुन चालणार नाही तर त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा महाविकास आघाडीत बंडखोर मोठी पाडापाडी करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.