Pune Crime Update: पूजा खेडकर कुटुंबावर पोलिसांचा छापा, मनोरमा-दिलीप खेडकर अद्याप फरार
पुणे-नवी मुंबईत घडलेल्या अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा धागा थेट बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी जोडला गेला आहे. अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार पुण्यातील बाणेर येथील दिलीप खेडकर यांच्या बंगल्यात आढळून आला.
आरोप आणि गुन्हा:
दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात थेट सहभागाचा आरोप आहे, तर त्यांची पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावर पळून जाण्यास मदत केल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी नमूद केले आहे की, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवर कुत्रे सोडल्याचे देखील आढळले आहे. यावर चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस छापा आणि झाडाझडती:
मनोरमा खेडकर यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी चतुश्रुंगी पोलिसांची टीम पुण्यातील खेडकरांच्या बंगल्यावर पोहोचली. पोलिसांनी बंगल्यातील कर्मचार्यांची सखोल चौकशी केली, मात्र मनोरमा खेडकर घरात आढळल्या नाहीत. पोलिसांनी सुमारे दोन तास बंगल्यात थांबून संपूर्ण परिसराची झडती घेतली.
पोलीसांच्या हाती काय लागलं?:
बंगल्यात पूजा खेडकरचा जुना मोबाईल ताब्यात घेतला गेला, परंतु दिलीप आणि मनोरमा खेडकरांचे मोबाईल अद्याप सापडलेले नाहीत. त्यांच्या लोकेशनचा शोध घेतल्यावर ते अखेर बंगल्यातच आढळले, मात्र पोलिसांनी आतमध्ये जाऊन तपास केला असता लोकेशन बंद झालेले आढळले. दिलीप-मनोरमा खेडकर यांच्या लॅन्ड क्रुझर गाडी वगळता इतर सर्व गाड्या बंगल्यातच आढळल्या. मनोरमा खेडकर एका कॅबमधून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
घडलेले अपघात आणि अपहरण:
शनिवारी सायंकाळी मुलुंड-ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रूझरचा अपघात झाला. अपघातानंतर गाडीतून उतरलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. ट्रक चालकाने ही घटना तात्काळ मालक विलास ढेंगरे यांना कळवली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.
सध्या पोलिसांचा शोध सुरू:
तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित लँड क्रूझरचा शोध सुरू केला आणि पुण्यातील बाणेर परिसरात दिलीप खेडकर यांच्या बंगल्यासमोर गाडी उभी असल्याचे आढळले. पोलिसांनी बंगल्यावर छापा मारला असता दिलीप आणि मनोरमा खेडकर फरार झाले होते. सध्या दोघांचा शोध सुरू असून पोलिस तपास करत आहेत.या प्रकरणामुळे पुणे शहरात सुरक्षा आणि अपहरणाचे प्रश्न गंभीर स्वरूप घेऊन पुढे आले असून, पोलीस आणि स्थानिक प्रशासन हे प्रकरण तातडीने हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/class-4-sathi-fakt-a-teacher/