मुंबई, दि. ३१ ऑगस्ट – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू
असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला कठोर
इशारा देत उद्यापासून कडक उपोषणाची घोषणा केली आहे.
जरांगे म्हणाले, “काल आणि आज मी पाणी प्यायलो,
पण उद्यापासून पाणी घेणार नाही. सरकार ऐकत नाही,
त्यामुळे उपोषण अधिक कडक करणार आहे.
मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असे पाऊल उचलायचे नाही.
अन्याय झाला तरी शांत राहायचे.
आरक्षण घेतल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, हा माझा शब्द आहे.”
यावेळी त्यांनी रेनकोट, छत्री वाटपाच्या नावाने होणाऱ्या गैरव्यवहारावरही भाष्य केले.
“समाजाच्या नावाने काही लोक धंदा करत आहेत.
माझ्या नावावर कमावत आहेत. कुणी रेनकोट,
छत्र्या वाटत असेल तर पैसे देऊ नका. समाजाची सेवा करा,
पण पैसे गोळा करू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारवर टीका करताना जरांगे म्हणाले,
“मुख्यमंत्र्यांनी उपसमितीला तातडीने मार्ग काढण्याचे आदेश दिल्याचे ऐकले.
मग उपाय का निघत नाही? फक्त बैठका घेत आहेत.
लय झाल्या बैठका; काही निर्णय होत नाही,”
अशी कडवट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आझाद मैदानात राज्यभरातून आलेल्या मराठा
समाजातील आंदोलकांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे.
आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/katapurna-prakshtun-panyacha-visarga-citizen-vigilance-call/