जालना – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आता आक्रमक भूमिकेत आले आहेत.
ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश व्हावा आणि पूर्वी मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राची अंमलबजावणी व्हावी
या दोन प्रमुख मागण्यांसाठी ते मुंबईकडे कूच करणार आहेत.
गावोगावी बैठकांचे आयोजन
या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. गावागावांत बैठका घेतल्या जात असून प्रत्येक घरातून किमान ५०० रुपयांची वर्गणी गोळा
केली जात आहे. तसेच प्रत्येक गावातून तीन ते चार वाहने आंदोलकांसोबत निघणार आहेत.
२७ ऑगस्ट रोजी मराठा तरुणांचा मोर्चा गावागावांतून निघणार असून त्यानंतर मुंबईच्या दिशेने कुच होईल.
शिवनेरीवरून होणार सुरुवात
आंदोलनाची सुरुवात शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन होईल.
त्यानंतर आंदोलक मुंबईकडे प्रस्थान करतील. या मोर्चात गणपतीची मूर्ती ट्रकवर ठेवली जाणार असून
तीच मूर्ती नंतर मुंबईत समुद्रात विसर्जित केली जाईल.
स्वयंपाकी व किराण्यासह लांब आंदोलनाची तयारी
मोर्चासाठी आंदोलकांनी सोबत किराणा घेतला आहे. स्वयंपाकी पथकही तयार ठेवण्यात आले आहे.
किमान पंधरा दिवस मुंबईत ठिय्या आंदोलन करण्याची तयारी आहे.
यावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी जाहीर केला आहे.