लोणार :जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराला आणि परिसरातील ऐतिहासिक मंदिरांना सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. सरोवराच्या पाणीपातळीत २.६९ मीटरने वाढ झाल्याने सरोवरकाठची १२ प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यात दगडमोड, गणपती, शिव मंदिर यांच्यासह चालुक्य, यादव आणि हेमाडपंथी काळातील अनेक मंदिरे आहेत.विशेषतः सरोवराच्या मध्यभागी असलेले कमळजा माता मंदिर यावर मोठं संकट ओढवलं आहे. मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी पोहोचल्याने भाविकांना दर्शनासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती भक्तांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे.सरोवराच्या ऐतिहासिक वारशाला धोका लोणार सरोवर आशियातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक असून, त्याचं पर्यावरणीय आणि धार्मिक महत्त्व प्रचंड आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.२०२२ साली तब्बल १४ वर्षांनंतर पाणीपातळीत वाढ नोंदवली गेली होती. २०२४ मध्येही सरोवराची पातळी २.६९ मीटरपर्यंत पोहोचली होती. आता २०२५ मध्ये पुन्हा तीच परिस्थिती ओढवली असून, सतत सुरू असलेल्या पावसामुळे मंदिरामध्येच पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तातडीने उपाययोजनांची गरज सरोवरकाठच्या मंदिरांची रचना वाचवण्यासाठी आणि भाविकांच्या गैरसोयी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी भाविक व अभ्यासकांकडून होत आहे.
READ ALSO:https://ajinkyabharat.com/samaj-parivartanchaya-ladhait-mahilani-participation-declaration/
