मानवतेला काळिमा! प्रसूत मातेचा जंगलातील प्रवास; रुग्णवाहिका चालकावर संतापाची लाट

रुग्णवाहिका

पालघरची धक्कादायक घटना! प्रसूत महिलेला जंगलात सोडून रुग्णवाहिका पळाली; २ किमी पायपीट करून कुटुंबीयांनी पोहोचवली घरी

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. अति दुर्गम आमला गावातील प्रसूत महिला सविता बारात (बांबरे) हिला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर घरी नेण्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेने चक्क गावापासून दोन किलोमीटर अंतरावर, तेही घनदाट जंगलातील निर्जनस्थळी उतरवून सोडल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधित रुग्णवाहिका चालकावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

काय घडले?

सविता बारात हिला 19 नोव्हेंबर रोजी प्रकृती बिघडल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी तिला जव्हार कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले. येथे तिची प्रसूती सुखरूप झाली. रविवारी, 24 नोव्हेंबर रोजी तिला रुग्णवाहिकेद्वारे घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, प्रवासादरम्यान रुग्णवाहिका चालकाने आमला गावापर्यंत न नेता दोन किलोमीटर आधीच असलेल्या रस्त्यावर — तेही दाट अरण्यात — प्रसूत महिला, तिची आई आणि सासूबाई यांना उतरवून तिथून निघून गेला.

Related News

प्रसूतीनंतरची धोकादायक पायपीट

प्रसूत महिला, नवजात बाळ आणि तिच्या दोन्ही सोबत्यांना दोन किलोमीटरचा रस्ता पायी चालत गावात पोहोचावे लागले. बाळ एका हातात आणि सविता यांना दुसऱ्या हाताने आधार देत कुटुंबीयांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीत ही पायपीट केली. मोखाडा–जव्हार परिसरात सध्या बिबट्यांची हालचाल वाढलेली असताना हा प्रकार अतिशय भयावह ठरू शकला असता.

कुटुंबाचा संताप

“प्रसूतीनंतर आई-बाळाच्या जीवाला काही झाले असते तर त्याची जबाबदारी कोणाची?” असा ज्वलंत प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. सरकारी योजना असूनही ग्रामीण आणि आदिवासी भागात अद्यापही मूलभूत आरोग्यसेवा आणि रुग्णवाहिका व्यवस्थेची दयनीय अवस्था असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.

स्थानिकांचा रोष आणि कारवाईची मागणी

या अमानवी कृत्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. मोखाडा–जव्हार भागात वन्यप्राण्यांचा धोका कायम असताना प्रसूत महिलेला आणि नवजात बाळाला निर्जन ठिकाणी सोडणे हा कृत्य कसा? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. संबंधित रुग्णवाहिका चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

ही घटना ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या भेगा पुन्हा स्पष्ट करणारी असून प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.

read also : https://ajinkyabharat.com/leopard-sighting-dindoshi-mumbaikar-ghabarle-societyat-bibtyacha-free-communication-3-big-deceptions-exposed/

Related News