मलकापूर शहरात पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून वाहन तपासणीदरम्यान तब्बल 46 लाख 78 हजार 850 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई 17 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजेपासून 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आली. अचानक झालेल्या या नाकाबंदीमुळे शहरातील नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या आदेशानुसार मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली तहसील चौक परिसरात नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, तपासणीदरम्यान MH 21 BV 3378 क्रमांकाच्या एका चारचाकी वाहनाला थांबवण्यात आले. या वाहनाची सखोल तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत ठेवलेल्या पिशवीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. वाहन चालकाचे नाव जगदीश ताराचंद गिरीवाले (वय 58, रा. ताडकसर गल्ली, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे असून, त्याने या रकमेच्या वाहतुकीबाबत कोणतीही समाधानकारक माहिती किंवा वैध कागदपत्रे पोलिसांना सादर केली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या वाहनातून 20 लाख रुपये रोख जप्त केली.
याच ठिकाणी तपासणीदरम्यान MH 21 BQ 8474 क्रमांकाचे दुसरे वाहन थांबवण्यात आले. या वाहनाचा चालक सलीम खान नुरू खान (वय 41, रा. धाड, ता. व जि. बुलढाणा) असून त्याच्या वाहनातही मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. तपासणीअंती या वाहनातून 26 लाख 78 हजार 850 रुपये रोख जप्त करण्यात आली.
या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 46 लाख 78 हजार 850 रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जप्त केलेली रक्कम पुढील तपासासाठी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली असून, त्यानंतर ती जिल्हा कोषागार कार्यालय, बुलढाणा येथे वर्ग करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती आयकर विभाग, जीएसटी विभाग तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सदर रक्कम नेमकी कुठून आली, कुठे नेण्यात येत होती आणि तिचा वापर कशासाठी होणार होता, याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. करचुकवेगिरी, अवैध व्यवहार किंवा अन्य कोणत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, पोलीस निरीक्षक गणेश गिरी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांच्या या धडक कारवाईचे शहरातील नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा प्रकारच्या तपासणी मोहिमांमुळे बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुढील चौकशीतून या मोठ्या रोकड व्यवहारामागचे नेमके सत्य लवकरच समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
