महायुती सरकारात छगन भुजबळ नाराज? गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहणास नकार
गोंदिया – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गोंदिया जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यास नकार दिला आहे.
यामागे त्यांची नाराजी असल्याची चर्चा रंगली असली, तरी भुजबळ यांनी तब्येतीचे कारण देत हा प्रस्ताव नाकारला आहे.
राज्यात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव सुरू असतानाच, १५ ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार यावरूनही नाराजीची हवा पसरली आहे.
नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना गोंदियात जाण्याची जबाबदारी देण्यात आली होती; मात्र त्यांनी ती नाकारली.
आता त्यांच्या ऐवजी मंत्री मंगल प्रभात लोढा गोंदियात ध्वजारोहण करतील. यासाठी सरकारने नवे परिपत्रक काढले आहे.
गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचा गुडघ्याचा ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना प्रवास करणे शक्य नव्हते, त्यामुळे ही जबाबदारी भुजबळांकडे आली होती.
मात्र भुजबळांनी, “मी अजिबात नाराज नाही. मला गोंदियाला जाणे शक्य नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याशी बोललो,” असे स्पष्ट केले.
तसेच अंबादास दानवे यांनी पाठविलेल्या पत्राचा माझ्याशी संबंध नसून, तो महिला व बाल कल्याण विभागाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनासाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करतील.
रायगडमध्ये तटकरे यांच्या नावावरून मंत्री भरत गोगावले नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा बीडमध्ये ध्वजारोहण करतील. पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पवार यांचा हा बीड दौरा विशेष ठरणार आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-chandrababu-naidunchaya-sampark-jagan-mohan-reddy/