महात्मा फुले समता परिषदचा थेट इशारा !

अध्यादेश रद्द करा, नाहीतर लोकशाही आंदोलनाची तयारी

बाळापूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बाळापूर तालुक्याच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार वैभव फरतारे यांच्याकडे निवेदन सादर केले गेले. या निवेदनाद्वारे शासनाने १ सप्टेंबर रोजी जारी केलेला मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.समता परिषदेचे पदाधिकारी आणि बाळापूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयाने सामाजिक न्याय आणि संवैधानिक अधिकारांवर घाला बसणार आहे. “हा निर्णय अत्यंत अन्यायकारक, बेकायदेशीर आणि असंवैधानिक असून मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजाला आणखी मागे ढकलणारा आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.समितीने सरकारकडून अनुच्छेद १५(४) आणि १६(४) नुसार आरक्षणाचे नियम पाळण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे ठळकपणे सांगितले आहे. तसेच, सरकारने राजकीय दबावाखाली जातींचा आरक्षणात समावेश केल्यास सामाजिक न्यायाचा मूलभूत तत्त्वभंग होईल, असेही निवेदनात अधोरेखित केले आहे.अखिल भारतीय महात्मा फुले समाज परिषदेचे तालुका पदाधिकारी व ओबीसी समाजाचे हजारो प्रतिनिधी या आंदोलनाच्या मागणीत सहभागी होते. त्यांनी सांगितले की, शासनाने जर नियम व संविधानाचा उल्लंघन करत असे निर्णय घेतले तर समाजाने लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या निर्णयामुळे सुमारे ४०० हून अधिक जातींच्या आरक्षणाचा अधिकार धोक्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षण, नोकरी, आणि सार्वजनिक प्रतिनिधित्वाच्या क्षेत्रात ओबीसी समाजाची स्थिती अधिकच कमजोर होणार आहे.समाज प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, “जर शासनाने या अन्यायकारक निर्णयाची दखल घेतली नाही, तर आम्ही प्रचंड लोकशाही आंदोलने करण्यास तयार आहोत. आमच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी सर्व स्तरांवर आवाज उठवू.”

read also : https://ajinkyabharat.com/koyi-gramasthancha-jilaha-arogya-aadhayankade-tatka-badalichi-magani/