रिसोड –महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लंपी या विषाणूजन्य
त्वचारोगाने थैमान घातले असून आता वाशिम जिल्ह्यातील रिसोड
तालुक्यातही या आजाराचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
शेजारील बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून
लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
हजारो गोवंश बाधित झाले तर शेकडो जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्याचाच संसर्ग आता वाशिम जिल्ह्यात पसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण अधिक गडद झाले आहे.
लंपी हा जनावरांमध्ये होणारा अत्यंत गंभीर विषाणूजन्य त्वचारोग असून त्वचेवर गाठी, ताप,
अंग सुजणे आणि दुधाळ जनावरांच्या उत्पादनात मोठी घट
अशा गंभीर लक्षणांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील लंपीची सद्यस्थिती
बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांत सर्वाधिक संसर्ग
हजारो गोवंश बाधित, शेकडो जनावरे मृत्युमुखी
दुध उत्पादनात 40% पर्यंत घट
पशुवैद्यकीय यंत्रणा अद्याप धीम्या गतीने काम करत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार
पोळ्याच्या सणावर परिणाम
शेजारील बुलढाणा जिल्ह्यात बैलांच्या पोळा सणावर बंदी घालण्यात आली होती. याच धर्तीवर वाशिम व इतर जिल्ह्यांतही प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. आठवडी बाजारात बाधित जनावरांची सर्रास वाहतूक होत असल्याने संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांची मागणी
प्रत्येक तालुक्यात तातडीने मोफत लसीकरण शिबिरे
बाधित गावांना तत्काळ सील करून नियंत्रण
जनावरांच्या तपासणीसाठी स्वतंत्र मोबाइल युनिट्स
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत
लंपीचा फैलाव महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर मोठ्या प्रमाणात दूध उद्योग, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आणि ग्रामीण अर्थव्यवस्था डळमळीत होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.