वाशिम – वाशिम पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत आंतरराज्यीय गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश झाला आहे. समृध्दी महामार्गावरून औषधाचा कंटेनर चोरी करणाऱ्या टोळीवर वाशिम पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलने तातडीने कारवाई केली. या कारवाईत एकूण ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ३८,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.२३ जुलै २०२५ रोजी भिवंडी येथून अँबोट कंपनीचा औषधांचा कंटेनर MH04JK7054 नागपूर, रायपूर, कटक व कोलकत्ता या शहरात पोहोचविण्यासाठी निघाला होता. पण महामार्गावरून जाताना अज्ञात चोरट्यांनी चालकाच्या नकळत कंटेनरचे तीन लॉक तोडून ४६ बॉक्स औषध चोरी केले. या चोरीची किंमत एकूण २,४३,८६,६८४/- रुपये होती. कंपनीने ही तक्रार ३० जुलै रोजी पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण येथे दिली.पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलने तपास सुरू केला. समृध्दी महामार्गावरून जाणाऱ्या ८५ हजार वाहनांची माहिती गोळा करून संशयित ट्रकांचा मागोवा घेतला. तपासात २ संशयित ट्रक आढळून आले, जे ट्रक मध्यप्रदेशातून येत होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ट्रक थांबवला आणि आरोपींना ताब्यात घेतले.चौकशीत आरोपींनी मुख्य आरोपींचे नाव राजेंद्र सादुलसिंग चौहाण असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेले दोन इलेक्ट्रॉनिक कटर, स्कार्पिओ गाडी क्र. MP09BC3739, तसेच इतर साहित्य जप्त केले.या कारवाईस मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या तिन टीमने अथक परिश्रम घेतले.सदर आरोपींनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे, गोवा, कर्नाटक व गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्या केल्याचे उघड झाले आहे. पोलीस अजूनही चोरी गेलेले औषध शोधण्यास मध्यप्रदेश व इतर ठिकाणी कार्यवाही करत आहेत. आरोपींवर कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/gramsthan-agreencha-gesture/
