राज्यात एलपीजी गॅस सिलिंडरबाबत निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. गॅस सिलिंडरचा अवैध साठा, काळाबाजार किंवा घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन ईटनकर यांनी साठेबाजांना स्पष्ट इशारा दिला आहे. नागपूर पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकांकडून शहरात आणि जिल्ह्यात धाडसत्र राबवले जाणार आहे. नागरिकांनी घाबरून गॅस सिलिंडरचा साठा करू नये, तसेच काळाबाजार करणाऱ्यांविषयी माहिती मिळाल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाची छापेमारी
गॅस सिलिंडरचा अवैध साठा आणि काळाबाजार रोखण्यासाठी नागपूरमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष मोहिम सुरू केली आहे. शहरातील गॅस एजन्सी, गोडाऊन आणि वितरण केंद्रांवर छापेमारी करण्यात येत आहे. गॅस पुरवठा आणि वितरण व्यवस्थित राहावे यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
Related News
पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी विनोद वाघदे आणि सागर बावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही जण घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर करून काळाबाजार करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले की, जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची किंवा अनावश्यक साठा करण्याची गरज नाही. सध्या जिल्ह्यात दररोज साधारणपणे 20 हजार 130 घरगुती गॅस सिलिंडरची विक्री होत आहे.
जिल्ह्यात विविध गॅस एजन्सीमार्फत नियमित वितरण सुरू आहे. सध्या दोन दिवसांचा रेडी स्टॉक उपलब्ध असून पुरवठा सुरळीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नियमित गरजेनुसारच सिलिंडर बुकिंग करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रिप्लिंग प्लांटमधून नियमित पुरवठा
नागपूर परिसरात HPCL कंपनीचा रिप्लिंग प्लांट कार्यरत आहे. या प्लांटमध्ये दररोज सुमारे 150 टन घरगुती गॅस येतो आणि त्याचे सिलिंडरमध्ये रिप्लिंग केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात साधारणपणे पाच ते सहा दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
IOC, BPCL आणि HPCL या तिन्ही तेल कंपन्यांकडेही पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे नाशिक डेपोमधून गॅस पुरवठा नियमित सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून गर्दी करण्याची आवश्यकता नाही.
बुकिंगसाठी नवीन सूचना
प्रशासनाने गॅस सिलिंडर बुकिंगबाबतही नागरिकांना सूचना दिल्या आहेत. एका सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर किमान 25 दिवसांनंतरच पुढील बुकिंग करावे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गॅस एजन्सीवर होणारी गर्दी टाळता येईल आणि सर्वांना वेळेत गॅस मिळू शकेल.गेल्या महिन्यात दररोज 700 ते 1000 सिलिंडरची विक्री होत होती. मात्र सध्या भीतीमुळे ही संख्या जवळपास दोन हजार सिलिंडरपर्यंत पोहोचली आहे. यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखणार
घरगुती गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर व्यावसायिक ठिकाणी होत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही लक्ष ठेवण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचा अवैध साठा आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.
तालुकास्तरीय भरारी पथक तैनात
जागतिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने विशेष पथके तैनात केली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पथकांमार्फत घरगुती गॅसचे वितरण, वाहतूक आणि वापर यावर लक्ष ठेवले जाणार आहे.या पथकांचे मुख्य काम म्हणजे गॅसचा अवैध वापर, काळाबाजार आणि साठेबाजी रोखणे. तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करणे ही जबाबदारीही या पथकांवर सोपविण्यात आली आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
गॅस सिलिंडरबाबत अफवा पसरवू नयेत, घाबरून साठा करू नये आणि नियमित वापरानुसारच सिलिंडर बुकिंग करावे, असे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. कुठेही गॅस सिलिंडरचा अवैध साठा, काळाबाजार किंवा घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावी, असेही सांगण्यात आले आहे.प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र साठेबाजी किंवा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
