लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातचा मोटराइज्ड तराफा ;गिरगाव चौपाटी सज्ज

भाविकांसाठी विसर्जन सोहळा अविस्मरणीय होणार

मुंबई : राज्यभरात उत्साहाने साजरा झालेला गणेशोत्सव आता समाप्तीच्या टप्प्यावर आहे. उद्या अनंत चतुर्दशी असून, प्रसिद्ध लालबागच्या राजाचे विसर्जन दिमाखात पार पडणार आहे. यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास मोटराइज्ड तराफ्याचा वापर होणार असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.दरवर्षी पारंपरिक तराफ्यावरून मूर्तीचे विसर्जन केले जात होते. मात्र, यंदा गुजरातमध्ये खास बनवून आणलेला आधुनिक तराफा वापरण्यात येणार आहे. हा तराफा 360 अंशात फिरू शकतो. त्याचबरोबर त्यावर लावलेले स्प्रिंकलर्स विसर्जनावेळी पाण्याचे फवारे उडवणार आहेत. यामुळे विसर्जनाचा सोहळा अधिक आकर्षक होणार आहे. विशेष म्हणजे हा तराफा स्वतःच समुद्रात पुढे जाऊ शकणार असून, त्यासाठी स्वतंत्र बोटीची मदत घेण्याची गरज राहणार नाही.मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत दाखल होतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने यंदा विशेष काळजी घेण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि जीएसबी गणेशोत्सव मंडळाने फेस डिटेक्टर प्रणाली कार्यान्वित केली आहे. इतर मंडळांमध्ये मेटल डिटेक्टर आणि अन्य यंत्रणांची व्यवस्था केली आहे.दरम्यान, गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून गर्दी नियंत्रणासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे, माहिती केंद्रे आणि मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे.यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसोबतच आधुनिक तराफ्याचा अनुभव हा यंदाच्या उत्सवाचा विशेष ठरणार आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/natwasathi-special-gift/