मुंबई – महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाणारी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
२१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देणाऱ्या या योजनेचा
गैरफायदा अनेकांनी घेतल्याचे समोर आले असून, पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनीही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या तपासणीत एकाच घरात दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणात आढळले आहे.
तब्बल २६ लाख महिलांची गृह चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमाप्रमाणे एका घरातील फक्त दोन महिलांनाच लाभ मिळू शकतो.
त्यामुळे जास्तीच्या महिलांची योजना बंद होणार असल्याचे संकेत आहेत. सध्या या योजनेचा लाभ २ कोटी २९ लाख महिलांना मिळत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच २६ लाख ३४ हजार महिलांना अपात्र ठरवल्यानंतर नाराज झालेल्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलासा दिला आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की,
जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता बुधवारी (६ ऑगस्ट) पासून थेट बँक खात्यात जमा
होऊ लागला असून, उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पुढील दोन दिवसांत रक्कम जमा होईल.
यामुळे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात ओवाळणीचा हप्ता पोहोचणार आहे.
मात्र गृह चौकशी पूर्ण झाल्यानंतर अनेकांना या योजनेतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/hotel-businessworm-halla-police-tapasawar-questions/