मुंबई : इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी
यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी रेड्डी यांना
औपचारिक पाठिंबा जाहीर करताना महत्त्वपूर्ण विधानं केली.
“देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि संविधानिक मूल्ये
जपण्यासाठी या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत.
इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने ही लढत लढवली जात आहे.
सुदर्शनसाहेब आमचे उमेदवार आहेत आणि आमच्याकडून त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे,”
असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले, “देशाला आज अशा उपराष्ट्रपतींची गरज आहे,
जे संविधानाच्या चौकटीत राहून, न्यायबुद्धी व विवेकबुद्धीने वागतील.
आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी
आम्ही ही निवडणूक लढवतो आहोत.”
एनडीए खासदारांवरही विश्वास
आवश्यक संख्याबळ नसतानाही लढा देण्यामागचं कारण स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले,
“संख्याबळ हे सगळं काही नसतं. मतदान गुप्त पद्धतीने होतं.
त्यामुळे ज्यांच्या ह्रदयात खरं देशप्रेम आहे असे
एनडीएचे खासदारसुद्धा देशाच्या हितासाठी मतदान करतील, असा विश्वास आहे.”
फडणवीसांच्या फोनवर …….
पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या फोनबाबतही प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,
“फडणवीसांनी फोन केला ही गोष्ट खरी आहे
. मात्र मला आश्चर्य वाटलं की, माझा पक्ष चोरून, माझे उमेदवार फोडून
, माझ्यावर अन्याय करून आता त्यांनाच माझा पाठिंबा हवा आहे.
हे नेमकं कोणतं राजकारण आहे? राष्ट्रपती निवडणुकीत आम्ही कोणतीही
विनंती न करता पाठिंबा दिला होता.
पण गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या,
ही पद्धत आम्ही मान्य करणार नाही.”
