कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 19 वर्षीय बेपत्ता तरुणीच्या प्रकरणात अखेर मोठी घडामोड घडली आहे. शाहूपुरी परिसरातून बेपत्ता झालेली ही तरुणी छत्तीसगडमध्ये सापडल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात एका तरुणाने लग्नाच्या आमिषाने तिला पळवून नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, संबंधित तरुणालाही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही 19 वर्षीय तरुणी बुधवार, 18 मार्च रोजी अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांकडून तपासात अपेक्षित गती दिसून येत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक तपासाला गती देत मोबाइल लोकेशन ट्रॅकिंगचा आधार घेतला. या तपासात तरुणीचा मोबाईल सिग्नल छत्तीसगड राज्यात आढळून आला. त्यानुसार तातडीने विशेष पथक रविवारी (22 मार्च) छत्तीसगडकडे रवाना करण्यात आले. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तरुणीचा ठावठिकाणा निश्चित केला आहे.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मोबाइल लोकेशनच्या आधारे तरुणी छत्तीसगडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमचे पथक तेथे पोहोचले असून, संबंधित तरुणालाही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांनाही दोन दिवसांत कोल्हापुरात आणले जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, तरुणीला सुरक्षितपणे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
Related News
या प्रकरणामुळे शाहूपुरी भागात नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. शनिवारी (21 मार्च) सुमारे 300 ते 400 नागरिकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यावर धडक देत जोरदार आंदोलन केले. तपासात होत असलेल्या विलंबाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून निरीक्षक संतोष डोके यांनी बाहेर येऊन आंदोलकांशी संवाद साधला आणि तपासाला गती देण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांनीही पोलिसांना अल्टिमेटम देत रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत तरुणी सापडली नाही, तर सोमवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेगाने हालचाली करत विविध ठिकाणी पथके पाठवली आणि तपास तीव्र केला.दरम्यान, या घटनेमुळे कोल्हापूर शहरात सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. विशेषतः ‘दुसऱ्या समाजातील तरुणाने पळवून नेले’ या आरोपामुळे काही संघटनांनी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आता तरुणी सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर परिस्थिती निवळण्याची चिन्हे दिसत आहेत.
छत्तीसगड पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई पार पडत असून, दोन्ही राज्यांतील पोलिस यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व सत्य समोर येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा अल्पवयीन किंवा तरुण मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांकडे समाजाचे लक्ष वेधले आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे, तसेच सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.सध्या तरी तरुणी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली असून, कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पुढील दोन दिवसांत दोघांनाही कोल्हापुरात आणल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास केला जाणार आहे.
