खामगावात कमळ फुलले; भाजपाच्या अपर्णाताई फुंडकर यांचा दणदणीत विजय, नगरपरिषदेत २९ जागांवर वर्चस्व

कमळ

खामगाव  :खामगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. रविवारी, २१ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयातील महात्मा गांधी सभागृहात जाहीर झालेल्या निकालानुसार नगराध्यक्षपदावर भाजपाच्या अपर्णाताई सागर फुंडकर यांनी तब्बल १० हजार ७६९ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भाजपाने नगरपरिषदेतही स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत अपर्णाताई फुंडकर यांना २५ हजार ६५४ मते मिळाली. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या स्मिता किशोर भोसले यांना १४ हजार ८८५ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या चेतना संजय शर्मा यांना ८ हजार ६३४ मते मिळाली. इतर उमेदवारांना मर्यादित मते मिळाली असून ‘नोटा’ला ५६२ मते पडली. एकूण ५२ हजार २ वैध मते नोंदवली गेली.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदाबरोबरच नगरसेवकांच्या निवडणुकीतही भाजपाने जोरदार मुसंडी मारली. एकूण ३५ नगरसेवकांपैकी भाजपाने २८ जागांवर थेट विजय मिळवला आहे. भाजपाप्रणीत अपक्ष उमेदवारासह एकूण २९ नगरसेवक भाजपाच्या गटात सामील झाले आहेत. उर्वरित जागांमध्ये काँग्रेसला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला ३ जागांवर समाधान मानावे लागले. इतर पक्षांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.

Related News

प्रभागनिहाय निकाल पाहता शहरातील बहुतांश प्रभागांत भाजपाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. प्रभाग क्रमांक १, ३, ४, ५, ६, ८, ९, १०, ११, १४, १५ आणि १६ मध्ये भाजपाच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. काही प्रभागांत विरोधी पक्षांनी लढत देत जागा मिळवल्या असल्या, तरी एकंदर चित्र पूर्णपणे भाजपाच्या बाजूने झुकलेले दिसून आले. प्रभाग १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने दोन्ही जागा जिंकत आपली उपस्थिती नोंदवली, तर प्रभाग २, १३ आणि १७ मध्ये काँग्रेसला मर्यादित यश मिळाले.

या घवघवीत विजयामागे भाजपाचे स्थानिक नेतृत्व, विशेषतः आकाश फुंडकर यांनी केलेले नियोजन आणि संघटन महत्त्वाचे ठरल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात भाजपाला यश आले. प्रचारादरम्यान विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, मूलभूत सुविधा आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा मुद्दा भाजपाने ठळकपणे मतदारांसमोर मांडला.

निकाल जाहीर होताच शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मिठाई वाटप, फटाके आणि घोषणांनी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना अपर्णाताई फुंडकर यांनी मतदारांचे आभार मानत, “खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू. सर्वांना सोबत घेऊन पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख कारभार केला जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.

एकूणच खामगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत शहरातील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवली आहेत. आगामी काळात भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थिर, सक्षम आणि विकासाभिमुख नगरपरिषद अस्तित्वात येणार, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/akot-municipal-council-elections-bjp-continues-to-be-in-power/

Related News