खामगाव (प्रतिनिधी):
खामगाव शहरातील ऐतिहासिक आणि ओळख निर्माण करणाऱ्या पंचायत समिती टॉवरवरील
घड्याळाचे ठोके अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या या घड्याळामुळे शहराच्या सौंदर्यात आणि ओळखीत घट झाली होती.
मात्र स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या मागणी नंतर हे
घड्याळ पुन्हा कार्यरत झाले असून, त्याचे ठोके आता वेळेची अचूकता सांगत आहेत.
पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीवर उभारलेला हा घड्याळ टॉवर अनेक दशकांपासून शहराच्या इतिहासाचा भाग राहिला आहे.
या ठिकाणी बसवलेले यांत्रिक घड्याळ पूर्वी दर तासाला ठोके मारत होते, जे शहरवासीयांना वेळेची जाणीव करून देत होते.
मात्र देखभाल अभावी काही वर्षांपूर्वी हे घड्याळ बंद पडले होते.
परिणामी अनेकांनी याची दुरुस्ती करण्याची मागणी वेळोवेळी केली होती.
अखेर पंचायत समिती प्रशासनाने याकडे लक्ष देत तांत्रिक तज्ञांच्या साहाय्याने घड्याळाचे पुन्हा जतन व दुरुस्तीचे काम हाती घेतले.
काही दिवसांच्या कामानंतर हे घड्याळ पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले.
यावेळी टॉवरच्या रंगरंगोटीचे कामही करण्यात आले असून, संपूर्ण इमारत आकर्षक दिसत आहे.
या घड्याळाच्या ठोक्यांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
काहींनी सांगितले की, “पूर्वी हे घड्याळ आमच्या दिनचर्येचा भाग होता .
त्याच्या ठोक्यांवर आम्ही वेळ ठरवत असू. आता पुन्हा ते सुरू झाल्याने मन आनंदित झालं आहे.”
या कार्याबद्दल स्थानिक नागरीकांनी पंचायत समितीचे आभार मानले असून,
शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
— पंकज ताठे आवृत्ती प्रमुख , खामगाव/ बुलडाणा
Read Also : https://ajinkyabharat.com/vyankatesh-balaji-school-madhe-lokmanya-tikanchi-jeevan-drama-regards/