कावड यात्रेकरीता जल आणण्यासाठी जाणाऱ्या वाहनाची तोडफोड

कावड यात्रेकरीता जल आणण्यासाठी जाणाऱ्या वाहनाची तोडफोड

पातूर: कावड यात्रेकरीता पातूर वरून काशी येथे जल आणण्यासाठी जाणाऱ्या वाहनाची तोडफोड

करून वाहनचालकास मारहाण करण्याची घटना घडली आहे.
पातूर येथील श्री. तपे हनुमान व्यायाम शाळेची दरवर्षी भव्य कावड यात्रा असते,

त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा २२ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास व्यायाम शाळेचे वाहन

क्रमांक एम.एच. ३० डीडी ४२७६ जल आणण्यासाठी काशी येथे निघाले असता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,

मिलिंद नगर येथे काही समाजकंटक युवकांनी कट मारल्याचे कारण दखवत सदर वाहन अडवून चालक यश गाडगे

(वय २१) रा.नानासाहेब नगर,पातूर याच्याशी वादविवाद करत अश्लील शिवीगाळ करून त्यास चापट-बुक्यांनी मारहाण केली

व त्याच्या खिशातून बळजबरीने १००० रुपये हिसकावून घेतले व गाडीच्या काचा फोडून नुकसान केले.

सदर घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी जमाव करण्यास सुरुवात केली होती.

पातूर शहरात कावड यात्रेदरम्यान सन २०१३ ला जातीय दंगल घडली होती व शहरात कर्फ्यु लागला होता,

सदर घटनेचे पडसाद उमटून मागील दंगलीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी श्री. तपे हनुमान व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष

अनंत उर्फ बालु बगाडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे

असे बजावल्याने एक मोठी घटना टळली.यावेळी पातूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जमाव पांगवून शहरात

शांतता प्रस्थापित करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घेतली.

सदर प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी आरोपी समीर बेग, आरिफ खान अमानूल्ला खान,

शेख अजीज शेख कालू तिघेही रा.पातूर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५, ३५२, ३२४, ४१३, ३१५(३)

अन्वये गुन्हा नोंदविला असून ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया –

मागील काळातील दंगलीच्या घटना पाहता पातूर शहराला अतिसंवेदनशील असल्याचा शिक्का लागला आहे.

आपल्याला शहराची प्रतिमा बदलायची असून सर्व धार्मिक सण-उत्सवात सामाजिक सलोखा ठेऊन कायदा व

सुव्यवस्था अबाधित राखून एकजुटीचे उदाहरण बनावे.येणारा कावड उत्सव देखील

शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

– अनंत बगाडे (संस्थापक अध्यक्ष, श्री.तपे हनुमान व्यायाम शाळा,पातूर)

Read Also : https://ajinkyabharat.com/goseva-green-service-undertaking-2025-plantation-karoon-sajra/