अकोला : अकोलाच्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू
असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज
(मंगळवार) सकाळी नऊ वाजता सर्व दहा दरवाजे ६० सें.मी.ने उघडण्यात आले.
यामुळे ४९४.८२ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
दरम्यान, पाण्याचा विसर्ग येत्या काही तासांत पावसानुसार
वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे,
नदीपात्र ओलांडण्याचा धोका पत्करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पूर नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून,
स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सुरक्षा कारणास्तव नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,
असे काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने आवाहन केले आहे.