काजळेश्वर उपाध्ये, कारंजा तालुका: कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुखमिणी संस्थान येथे भरत भेटीचा कार्यक्रम दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्रभर राम-रावण दरबार भरून साजरा झाला. या कार्यक्रमात राम-रावण सैन्यासह तुंबळ युद्धाचे सजीव नाट्यमय सादरीकरण झाले. रावण वधानंतर कुंभकर्ण दहन करण्यात आले व श्रीरामाचा राज्याभिषेक पार पडला.
वृत्त असे की, काजळेश्वर येथे तीन दिवसीय कार्तिक उत्सवाच्या पहिल्या दिवशी नगरभोजनानंतर रात्री भरत भेटीचा कार्यक्रम नाटकाच्या रूपात सादर करण्यात आला. कार्यक्रमात सूत्रधार, शारदा स्तवण, रावणाचा दरबार, गुरु वशीष्ठ पर्णकुटी, अंगद शिटाई, सुपर्णखा विडंबन, सीता हरण, मारीच वध, जटाऊ वध, इंद्रजीत शक्ती लागणे, लक्ष्मण शक्ती लगणे, हनुमंताने द्रोणागिरी पर्वताहून वनस्पती औषधी आणणे, इंद्रजीत वध, राम-रावण घनघोर युद्ध, रावण वध व कुंभकर्ण दहन असे सर्व प्रसंग नाट्यमय सादरीकरणात दिसले.
संपूर्ण नाटक युवा वर्गाने सादर केले, तर कार्यक्रम पाहण्यासाठी गावकरी, महिला, युवक आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहात हा भरत भेटीचा कार्यक्रम पार पडला आणि उपस्थितांनी आनंदाने उत्सवाचा भाग घेतला.
