कारंजा (सुनील फुलारी)
शहरातील अनेक भागांत गेले काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा अचानक खंडित होण्याचे प्रकार सतत घडत आहेत.
विशेषतः रात्री एक ते दोन तास लाईट गायब होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
उष्म्यामुळे त्रस्त झालेले नागरीक अंधारात वेळ काढत असून, लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे हाल होत आहेत.
अधिक चिंतेची बाब म्हणजे या लाईट बंद होण्यामागील कारण अद्याप महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
या समस्येची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी वारंवार वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कुणीही फोन उचलत नसल्याने लोकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.
“जर अधिकारी आणि कर्मचारी फोन उचलणार नसतील, तर मग शासनाने दिलेले मोबाईल वापरण्याचा उद्देश तरी काय?”
असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की, महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी हे जनतेचे फोन उचलणार नाही,
असा काही अंतर्गत निर्णय घेऊन बसले आहेत काय? असा संशयही व्यक्त होत आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ खुलासा करून नागरिकांना वस्तुस्थितीची माहिती द्यावी
आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी जोरदार मागणी सध्या नागरिकांतून होत आहे.