Kangana Vs Taapsee: ‘स्वस्त कॉपी’वरून पुन्हा वाद; कंगनाचा तापसीवर हल्लाबोल, थेट आई-वडिलांवरही केली टिप्पणी
Kangana Vs Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तापसी पन्नूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनासोबतच्या वादावर भाष्य केल्यानंतर कंगना यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तापसीवर जोरदार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, यावेळी कंगना यांनी तापसीच्या आगामी चित्रपटाचा उल्लेख करण्यासोबतच तिच्या आई-वडिलांवरही वैयक्तिक टिप्पणी केली आहे.
कंगना आणि तापसी यांच्यातील हा वाद बॉलिवूडमधील चर्चेतील जुन्या वादांपैकी एक मानला जातो. दोघींनी अनेकदा एकमेकींबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या सोशल मीडिया वॉरमुळे हा वाद पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
तापसीने मुलाखतीत कंगनाबाबत काय म्हटलं?
तापसी पन्नूने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौतसोबतच्या जुन्या वादावर भाष्य केलं. या वादाच्या आधी किंवा नंतर कंगना आणि आपली प्रत्यक्ष भेट झालेली नसल्याचं तापसीने सांगितलं. दोघींचे विचार आणि एखाद्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
Related News
एखाद्या व्यक्तीबद्दल आपण व्यक्त करत असलेलं मत हे आपल्या संगोपनाचं आणि विचार करण्याच्या पद्धतीचं प्रतिबिंब असतं, असं तापसीने म्हटलं. तिच्या या वक्तव्याचा संदर्भ कंगनाच्या लक्षात आल्यानंतर कंगना यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं.
Kangana चा तापसीवर पुन्हा ‘स्वस्त कॉपी’चा वार
Kangana यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तापसीचं नाव थेट घेतलेलं नसलं तरी पोस्टमधील संदर्भ स्पष्टपणे तापसीकडे असल्याचं मानलं जात आहे. कंगना यांनी पुन्हा एकदा तापसीसाठी ‘स्वस्त कॉपी’ हा शब्द वापरला.
Kangana यांनी तापसीच्या आगामी चित्रपटावरही टीका केली. संबंधित पोस्टमध्ये त्यांनी आपल्या संगोपनावर आणि आई-वडिलांवर टिप्पणी करण्यात आल्याचा दावा केला. कोणत्याही वादामध्ये समोरच्या व्यक्तीच्या आई-वडिलांना ओढणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
मात्र, त्याच पोस्टमध्ये कंगना यांनी तापसीच्या पालकांवर वैयक्तिक स्वरूपाची टिप्पणी करत सवाल उपस्थित केला. आपल्या आई-वडिलांसारखी ‘ओरिजिनल’ व्यक्ती तापसीच्या पालकांना का घडवता आली नाही, असा टोला त्यांनी लगावला. कंगनाच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा दोन्ही अभिनेत्रींच्या वादाची चर्चा रंगली आहे.
Kangana -तापसी वादाची सुरुवात नेमकी कधी झाली?
Kangana आणि तापसी पन्नू यांच्यातील वादाची सुरुवात 2019 मध्ये झाल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी कंगनाच्या ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तापसीने या ट्रेलरचं कौतुक केलं होतं. मात्र, तिने कंगनाचं नाव घेतलं नव्हतं.
यावर कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिने तापसीवर सोशल मीडियातून टीका केली होती. रंगोलीने तापसीला ‘स्वस्त कॉपी’ असं संबोधल्यामुळे हा वाद मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. त्यानंतर कंगना आणि तापसी यांच्यातील मतभेद बॉलिवूडच्या चर्चेचा विषय बनले.
नेपोटिझमच्या मुद्द्यावरूनही रंगला होता वाद
2020 मध्ये बॉलिवूडमध्ये नेपोटिझम, स्टार किड्स आणि आउटसाइडर्स या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी कंगना राणौतने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर टीका केली होती. तापसी पन्नूचाही या चर्चेत उल्लेख झाला.
कंगनाने तापसीसह काही अभिनेत्रींबाबत कठोर शब्दांचा वापर केला होता. त्यानंतर तापसीनेही आपली भूमिका मांडली होती. मात्र, कंगनावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा आपण आपलं मत मांडत असल्याचं तापसीने अनेकदा स्पष्ट केलं आहे.
दोघींमधील हा वाद केवळ सोशल मीडिया पोस्टपुरता मर्यादित राहिलेला नाही. मुलाखती, सार्वजनिक वक्तव्ये आणि बॉलिवूडमधील विविध मुद्द्यांवर दोघींच्या भूमिकांमध्ये फरक दिसून आला आहे.
पुन्हा सोशल मीडिया वॉर; चर्चेला उधाण
तापसीच्या ताज्या मुलाखतीनंतर कंगनाने केलेल्या पोस्टमुळे हा जुना वाद पुन्हा समोर आला आहे. विशेष म्हणजे, यावेळी कंगनाने तापसीच्या कुटुंबीयांचा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
कंगना राणौत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि आक्रमक सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखल्या जातात. दुसरीकडे तापसी पन्नूनेही अनेकदा विविध सामाजिक आणि बॉलिवूडशी संबंधित मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे दोघींमधील मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.
आता तापसी पन्नू कंगनाच्या या ताज्या पोस्टवर काय प्रतिक्रिया देते, याकडे चाहत्यांचं आणि बॉलिवूडचं लक्ष लागलं आहे. तापसीकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतर हा वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.
