वाशिम – जिल्ह्यातील कामरगाव येथे लोकवस्तीतील देशी दारूचे दुकान गावाबाहेर हलविण्याच्या मागणीसाठी
ग्रामपंचायतसमोर महिलांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
पंचायत समिती सदस्या शबाना परवीन मनोद्दीन सौदागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
कामरगाव हे २० ते २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, परिसरातील अनेक खेड्यांचे नागरिक येथे बाजारपेठेत येत असतात.
गावातील बसस्टॅंड जवळ असलेल्या नितीन देवरे यांच्या देशी दारू दुकानामुळे शाळकरी मुले, महिला आणि सर्वसामान्य
ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.
१६ जानेवारी २०२५ रोजी ग्रामसभेच्या विशेष ठरावानुसार हे दुकान गावापासून किमान १ किलोमीटर अंतरावर स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, एक वर्ष उलटूनही ग्रामपंचायतीने ठरावाची अंमलबजावणी केली नाही.
उलट, दारू विक्रेत्यांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हाताशी धरून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर महिलांनी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या देऊन
उपोषण करण्याचा निर्धार केला असून, जिल्हाधिकारी वाशिम यांना याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.