कल्याण शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला शहाड उड्डाण पूल दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामासाठी 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) पुलाच्या सांध्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण आणि बेअरिंग बदलण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे पुलाच्या सांध्यांमध्ये गळती सुरू झाली होती आणि रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतुकीवरील निर्बंध:
कालावधी : 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025
पुलावरून कोणत्याही वाहनाला वाहतूक करता येणार नाही , अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता, अवजड वाहनांना पर्यायी मार्गांवर सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत प्रवेशबंदी.
वाहतूक विभागाचं आवाहन:वाहतूक विभागाने अधिसूचना जारी करून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहनचालकांना आवाहन केलं आहे की, “पुलावर अजिबात गर्दी करू नका. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करा, अन्यथा मोठ्या कोंडीत अडकण्याचा धोका आहे.”
पर्यायी मार्गांचे तपशील:
मुरबाड – माळशेज घाटाहून येणारी वाहने:
बारवी डॅम फाटा येथे प्रवेश बंद
मार्ग: बदलापूर रस्ता → बदलापूर → पालेगाव → नेवाळी नाका → मलंगगड रस्ता → लोढा पलावा / शीळ डायघर / पत्रीपूल
मुरबाड तालुक्यातून शहाड पुलाकडे येणारी वाहने:
दहागाव फाटा (रायता गाव) येथे प्रवेश बंद
मार्ग: रायता गाव → वाहोली → मांजर्ली → बदलापूर → पालेगाव → नेवाळी नाका → पत्रीपूल
कल्याण, भिवंडी, ठाणेकडून मुरबाडकडे जाणारी वाहने:
दुर्गाडी पूल येथे प्रवेश बंद
मार्ग: दुर्गाडी पूल → गोविंदवाडी वळण → पत्रीपूल → चक्कीनाका → नेवाळी नाका → पालेगाव → बदलापूर
महत्त्वाचं: पुल बंद असल्याने कल्याण – मुरबाडमार्गे माळशेज घाट, जुन्नर, नगरकडे जाणाऱ्या मुख्य वाहतुकीला फटका बसणार आहे. म्हारळ, मुरबाड परिसरातील नोकरदार, व्यावसायिक तसेच बाजार समितीकडे भाजीपाला व फळे घेऊन येणाऱ्या वाहनांनाही अडचणी येतील. त्यामुळे वाहनचालकांनी संयम बाळगून, वाहतूक पोलिसांनी सुचवलेले पर्यायी मार्ग वापरावेत. “शहाड पुलावरून वाहतूक टाळा, पर्यायी मार्ग वापरा आणि सहकार्य करा. पुढील 15 दिवस वाहतुकीच्या नियोजनात बदल आवश्यक आहे.”
read also:https://ajinkyabharat.com/defeat-sanghalahi-minnar-kotinch-reward/