स्टार प्रवाहवर लवकरच
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘काजळमाया’ या मालिकेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट उभारली आहे. मालिकेचा पहिला टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनात “ती” कोण असेल याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.या मालिकेत नवोदित अभिनेत्री रुची जाईल आणि अभिनेता अक्षय केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टीझरमध्ये दिसणारी ‘ती’ म्हणजे विलक्षण सुंदर, तंत्रविद्येत प्रविण आणि चेटकीण असलेली पर्णिका. तिला चिरतारुण्याचं वरदान लाभलेले आहे. रुपाने सुंदर असली तरी पर्णिका अत्यंत स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. तिचं एकमेव ध्येय म्हणजे स्वतःचा वंश वाढवणे, आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.रुची जाईलने मालिकेबाबत सांगितले, “ही माझी पहिली मालिका आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री व्हायचं स्वप्न या मालिकेद्वारे पूर्ण होत आहे.”तिने पुढे सांगितले, “काजळमाया मालिकेत मी विलक्षण सुंदर अश्या चेटकीणीच्या रुपात दिसणार आहे. प्रोमो शूटच्या दिवशी जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहिलं, तेव्हा एका क्षणासाठी घाबरल्यासारखं वाटलं. मालिकेचं कथानक जितकं गूढ आहे, तितकच उत्कंठावर्धकही आहे.”प्रेक्षकांना प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होईल हे पाहण्याची उत्कंठा निर्माण होईल, अशी अपेक्षा रुचीने व्यक्त केली आहे. ‘काजळमाया’ मालिकेतून रुची जाईल मालिकेच्या विश्वात दमदार एण्ट्री करत आहे, आणि तिच्या भूमिकेने प्रेक्षकांना नक्कीच खेचून आणणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/human-rights-commission-attack/
