राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं चित्र होतं, मात्र आता पुन्हा एकदा हवामानात बदल होत
असून आज (३० जुलै) राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, घाटमाथा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला
असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
या भागांमध्ये दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, वाहतूक खोळंबणे अशा घटनांची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
नागरिकांनी आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
विदर्भात (अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली) पावसाचा जोर अद्याप कायम आहे.
संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे काही भागांत शेतात पाणी साचत असून याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होऊ शकतो.
बीड, लातूर आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मात्र, पिकांवर नियंत्रण ठेवा कारण या वातावरणात तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.