चोहट्टा बाजार परिसरात दलालांची दिवाळी…
चोहट्टा बाजार हा परिसर वीटभट्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात जिल्हासह तर इतर जिल्ह्यात बांधकामाकरिता लागणाऱ्या विटांचा पुरवठा होतो.
आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर व्यावसायिक त्रस्त झाले आहे. त्यामध्ये चोहट्टा बाजार परिसरात काही दलाल दिवाळी वसुली करिता सक्रीय झाले असल्याचे बोलले जाते. विशेष बाब म्हणजे हे दलाल महसूल विभागाचे नाव सांगून वसुली करीत असल्याचे काहींचे नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणणे आहे. हा भाग अकोट तहसील विभाग व महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखित येतो. महसूल विभागाचे नाव सांगून वसुली करणारे हे दलाल कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरंच जर असे होत असेल तर याकडे संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. या संदर्भात एका पत्रकाराने मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता, त्या पत्रकाराला दलालांनी अर्वाच्य शब्दात दम देत एक प्रकारे धमकी दिल्याचेही बोलले जाते. महसूल विभागाचे नाव हे दलाल घेत असल्यामुळे या बाबत एकही वीटभट्टी धारक बोलावयास तयार नाही. तसेच या संदर्भात महसूल विभागातील मंडळ अधिकारी, पटवारी यांना विचारणा केली असता ते सुद्धा अनभिज्ञ आहेत. परंतु येथील परिस्थिती वेगळी असल्याचे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या नावावर होत असलेली ही वसुली मात्र गंभीर असून याची सखोल चौकशी केली तर मोठे रॅकेट समोर येऊ शकते. एकंदरीत दबक्या आवाजात हा प्रकार सुरू असून नाईलाजाने अनेक जण याला बळी पडत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/punjab-dig-corruption-case-7-crore-cash-1-5-kg-gold-and-luxury-car-seized/
