Jitendra Awhad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा काल भव्यतेत पार पडला.
राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं.
खरंतर मनसेचा हा गुढी पाडवा मेळावा आणि शरद पवार यांच्या पक्षाचा तसा काही संबंध नाही.
Related News
पण शरद पवार यांच्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
हे आभार का मानले आहेत? ते जाणून घ्या.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य मेळावा पार पडला.
राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक आले होते.
यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात गाजत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर भाष्य केले.
महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हटवावी, अशी भूमिका काही पक्षांनी घेतली आहे.
राज ठाकरे यांनी बिलकुल त्या उलट भूमिका घेतली. औरंगजेबाची कबर का हटवू नये?
त्यामागचा विचार राज ठाकरे यांनी सभेत बोलून दाखवला. “१६८१ ते १७०७ म्हणजे २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता.
संभाजी राजांबरोबर लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारले. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या.
औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता.
पण जमले नाही. सर्व प्रयत्न केले आणि तो मेला” असं राज ठाकरे म्हणाले.
“जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. जगभरातील लोकांना कळते तो काय करायला गेला होता आणि कसा मेला.
तिथे शिवाजी महाराजांचे नाव येते. आता औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे.
त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…” असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
“औरंगजेब हा आमचा इतिहास आहे. इतिहास कशासाठी वाचायचा. इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा.
मराठ्यांनी ज्यांना गाडले त्याची प्रतिके नष्ट करून चालणार नाही.
जगाला कळले पाहिजे आपण त्यांना गाडले” असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करुन राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी का आभार मानले?
“मी जे औरंगजेब/अफझलखाना बद्दल बोल्लो होतो, तेच आज राज ठाकरे बोलले ..
आभार. महाराजांचा इतिहास पुसू देणार नाही” असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय.
“काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून अतिशय योग्य भूमिका
मांडली तीच भूमिका मी विधानसभेत मांडली होती” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे