जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती परिसरात भीषण ढगफुटी

किश्तवाडच्या चशोतीत ढगफुटी; १० जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

किश्तवाडच्या चशोतीत ढगफुटी; १० जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

किश्तवाड (जम्मू) – जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती परिसरात गुरुवारी (१४ ऑगस्ट) भीषण ढगफुटी झाली.

या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढगफुटीनंतर परिसरात अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, सेना यांचे पथक घटनास्थळी पोहोचून बचाव व मदतकार्य सुरू आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांच्याकडून माहिती मिळताच किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनीही या भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि नुकसानीची शक्यता व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने बचाव पथके रवाना केली असून वैद्यकीय सुविधा व इतर मदत तैनात केली आहे.

किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा यांनी सांगितले की, चशोती हे मचैल माता यात्रेचे प्रारंभिक ठिकाण असून ढगफुटीमुळे आलेल्या पूराचा या भागावर मोठा परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त करत, एनडीआरएफ पथकांची मागणी केली आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत शोकाकुल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि बचाव मोहिमेला वेग देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, श्रीनगर हवामान केंद्राने पुढील ४ ते ६ तासांत जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची व वीजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे.

पर्वतीय आणि संवेदनशील भागांत ढगफुटी, अचानक पूर, भूस्खलन व दगड कोसळण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

अगोदरच उत्तरकाशीमध्ये भीषण आपत्ती

५ ऑगस्ट रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या धराली येथेही ढगफुटी झाली होती. खीरगाड नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक हॉटेल्स, घरे आणि होमस्टे वाहून गेले.

या आपत्तीत ६८ जण बेपत्ता असून, त्यामध्ये नेपाळ, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील नागरिकांसह लष्करातील ९ जवानांचा समावेश आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/akot-polis-thakayatta-samiti-meeting-concluded/