जांभोरा गावातील तलाव फुटला; शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
सिंदखेडराजा राजा तालुक्यातील जांभोरा गावातील (दि.१७) तलाव पावसामुळे फुटून शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली.
परिणामी सोयाबीन, कापूस, फळबाग व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
मागील दोन-तीन दिवसांपासून परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावातील पाण्याचा दाब वाढला होता.
शनिवारी पहाटे गट क्रमांक ५३ आणि ५४ मधील तलाव मध्यभागी फुटला. त्यातून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे खालच्या शेतातील पिके वाहून गेली.
गणेश अशोक खरात यांचे सात एकरवरील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यात चार एकरवरील वांगी, दोन एकरवरील टोमॅटो, दीड एकरवरील सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले. इतर शेतकऱ्यांची पिकेसुद्धा जलमय झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सिंचन विभागाने जेसीबीच्या सहाय्याने फुटलेला तलाव बुजवण्याचा प्रयत्न केला;
मात्र पाण्याचा विसर्ग प्रचंड असल्याने प्रयत्न अपयशी ठरले. तहसीलदार अजित दिवटे, पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “वेळीच दुरुस्ती केली असती तर हे नुकसान टळले असते. आता प्रशासनाने तात्काळ मदत करावी.”
READ ALSO :https://ajinkyabharat.com/thanadar-kishore-junaghare-yana-maharashtra-shashanacha-sanman/