जळगावात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार

जळगाव : मुक्ताईनगर बोदवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे आज दुपारी बोदवड तालुक्यातील राजुर गावात प्रचाराला आले असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेनं जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये सध्या चुरशीचे वातावरण निवडणुकीमध्ये सुरू आहे. यातच अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे आज राजुर गावात प्रचार रॅली असताना रस्त्यावर दुचाकींवरुन जात होते. त्याचदरम्यान, दोन अज्ञातांकडून विनोद सोनवणे यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. आज सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील हनुमान मंदिरावर जाऊन दर्शन घेऊन प्रचार करायला सकाळी सुरुवात केली. सकाळी प्रचाराला जात असताना दुचाकीवर तीन जण उभे होते. ते माझे स्वागतासाठी उभे असावे असा माझा अंदाज होता. मात्र त्यातील एकाने माझ्यावर दोन राऊंड फायर केले. मात्र त्यात मी थोडक्यात बचावलो आहे. गोळीबार करून ते तात्काळ तिथून पसार झाले. मात्र, गाडीच्या एक इंचवरुन गोळी केल्याने थोडक्यात माझे प्राण वाचले असल्याची माहिती अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी दिली. माझ्यावर घातपात असू शकतो त्यांचा एक व्हिडिओ माझ्याजवळ आलेला आहे. व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती आलेले आहे. हा राजकीय हेतू असू शकतो किंवा अन्य दुसऱ्या कारणामुळे ही घटना घडली असावी. याचा तपास बोदवड पोलीस स्टेशन करेल. लांब केस असलेला आणि टोपी घातलेले व्यक्ती होते,  अशी माहिती विनोद सोनवणे यांनी दिली.