जेलबाहेर येताच फैजलचा तांडव; मध्यरात्री मैत्रिणीवर थेट गोळीबार

जेलबाहेर येताच फैजलचा तांडव; मध्यरात्री मैत्रिणीवर थेट गोळीबार

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबाराने खळबळ; ड्रग्ज तस्कर फैजलने मैत्रिणीवर केला हल्ला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील किलेअर्क भागात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अमली पदार्थ तस्करीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला फैजल उर्फ तेजा एजाज सय्यद (रा. किलेअर्क) याने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याचा प्रकार घडला.

गोळी मैत्रिणीच्या हाताला लागल्याने ती गंभीर जखमी असून, तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जामिनावर सुटून केवळ १०  दिवसात पुन्हा गुन्हा

घटना काल (सोमवार) रात्री सुमारे ११  वाजताच्या सुमारास घडली. आरोपी तेजा हा केवळ ८ ते १०  दिवसांपूर्वीच जामिनावर जेलमधून बाहेर आला होता.

त्याच्यावर शस्त्रसाठा, बलात्कार, ड्रग्ज तस्करी यांसारखे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी एनडीपीएस पथकाने त्याच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अटक केली होती.

वादातून गोळीबार

काल रात्री फैजलची मैत्रीण त्याच्या घरी आली असता, दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून तीव्र वाद झाला.

हा वाद हाणामारीत बदलला आणि संतापाच्या भरात फैजलने आपल्या पिस्तुलातून गोळी झाडली.

गोळी थेट मैत्रिणीच्या हाताला लागून ती रक्तबंबाळ झाली.

पोलिसांची तात्काळ कारवाई

घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

आरोपीला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली. जखमी तरुणीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, ती सध्या जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने पुढील तपास सुरू आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/mahayuratit-narajinatya-vadle-palakamantraipadavarun-churchna-tal/